Nashik News : महापालिकेकडून घरपट्टी अभय योजनेत 23 कोटींची वसुली; 37,689 करदात्यांचा सहभाग

10 दिवसांत पालिका तिजोरीत 2 कोटी जमा

एमपीसी न्यूज – महापालिकेची तिजोरी भरण्यात महत्त्वाची जबाबदारी उचलणाऱ्या घरपट्टीमुळे गेल्या दहा दिवसांत पालिकेच्या तिजोरीत दोन कोटी रुपये जमा झाले आहेत. साधारणपणे 300 कोटींची घरपट्टी थकबाकी वसुलीत येत असलेल्या अडचणी लक्षात घेत महापालिकेने 1 नोव्हेंबरपासून दंडात सवलत देण्यासाठी सुरु केलेल्या अभय योजनेचा 37 हजार 689 करदात्यांनी लाभ घेतल्यामुळे 23 कोटी 40 लाख रुपयांची वसुली झाली आहे.

विषेश म्हणजे गेल्या दहा दिवसांत पालिकेच्या तिजोरीत दोन कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे कोरोनानंतर उत्पन्नासाठी धडपड करणाऱ्या पालिकेसाठी ही योजना संजीवनी ठरली आहे.

कोरोनामुळे सक्तीने वसुली करण्याचा पर्याय बंद झाल्याने महापालिकेची कोंडी झाली होती; घरपट्टी थकबाकीच्या दंडात माफी देण्यासाठी 1 नोव्हेंबरपासून अभय योजना मंजूर केली गेली. गेल्यावर्षी 2019-20 या आर्थिक वर्षात योजनेच्या माध्यमातून महापालिकेला 42 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. यंदाही या योजनेतून महापालिकेला अभय योजनेमुळे थकबाकी मिळण्याची आशा आहे.

या योजनेंतर्गत 15 जानेवारीपर्यंत थकबाकीवरील दंडाच्या रकमेत 75 टक्क्यांपर्यंत, 15 फेब्रुवारी या दरम्यान 50 टक्के तर तिसऱ्या टप्प्यात 16 ते 28 फेबुवारीअखेरपर्यंत 25 टक्के सवलत दिली जाणार आहे. या योजनेंतर्गत 23 कोटी 40 लाख 39 हजार 803 रुपयांची थकबाकी वसूल झाली असून थकबाकीपोटी 16.34 कोटी तर चालू करवसुलीपोटी 11.93 कोटींची घरपट्टी जमा झाली आहे. नाशिकरोड, नाशिक पूर्व, पश्चिम व पंचवटी या चार भागात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

योजनेचा लाभ घेणाऱ्यांना 4.93 कोटी तर, सोलरचा वापर करणाऱ्यांना अतिरिक्त एक लाख 32 हजारांची करसवलत मिळाली. 15 जानेवारीनंतर दुसरा टप्पा सुरू झाला असून गत दहा दिवसात या योजनेंतर्गत 3760 करदात्यांनी एक कोटी 85 लाख 84 हजार 832 रुपये जमा केले आहेत. दुसऱ्या टप्याची मुदत ही 15 फेब्रुवारीपर्यंत असणार असून त्यात चांगली वसुली होईल, असा विश्वास कर उपायुक्त प्रदीप चौधरी यांनी व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.