Vadgaon Maval : वडगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सुभाष जाधव; उपाध्यक्षपदी भाजपचे निलेश म्हाळसकर

एमपीसी न्यूज – सत्तेचा सारीपाट मिळून मांडावा असा काहीसा प्रत्यय वडगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीतून आला आहे. मावळचे मुख्यालय असलेल्या वडगावमध्ये प्राबल्य दाखवण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपने ‘मिल बाटके’ असे सत्तेचे समीकरण मांडले आहे. अध्यक्षपदी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुभाष रघुनाथ जाधव यांची तर उपाध्यक्षपदी भाजपचे नीलेश दशरथ म्हाळसकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

यावेळी मावळ भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर,वडगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष मयूर ढोरे,खरेदी विक्री संघाचे माजी उपसभापती पंढरीनाथ ढोरे, वडगाव शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रवीण ढोरे,वडगाव शहर भाजपा अध्यक्ष अनंता कुडे,माजी उपसरपंच विशाल वहिले, राजेश बाफना, अरुण चव्हाण, बाळासाहेब म्हाळसकर आदी उपस्थित होते

राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्ये ठरल्याप्रमाणे वडगाव सोसायटीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली होती. दोन्ही पक्षांनी प्रत्येकी सहा जागा घेऊन अध्यक्ष व उपाध्यक्षपद प्रत्येक वर्षी आलटून – पालटून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुभाष जाधव यांचा तर उपाध्यक्षपदासाठी भाजपकडून नीलेश म्हाळसकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. व्ही. जे. तळपे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. दरम्यान, उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.

कट्टर शत्रू बनले अखेर सख्खे मित्र!

मावळ तालुक्यात सुरुवातीपासून कायम भाजप आणि राष्ट्रवादी अशी दुहेरी लढत होते. त्यात सलग 25 वर्ष मावळमध्ये भाजपची सत्ता होती. त्यामुळे मावळ हा भाजपचा गड आहे, असे म्हटले जात होते. मात्र सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत हे समीकरण बदलले आणि मावळमध्ये घड्याळाचा करिष्मा झाला.

सुनील शेळके यांच्या माध्यमातून मावळ राष्ट्रवादीला खंदे नेतृत्व मिळाले. त्यानंतर सुनील शेळके आणि भाजप यांच्यात तालुक्यातील प्रत्येक निवडणुकीत चुरस बघायला मिळत असे. वडगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत देखील ही चुरस बघायला मिळेल, असा मावळ वासियांचा कयास होता. मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपने मावळ वासियांना वेगळाच धक्का दिला.

राजकारणाच्या आखाड्यात एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांनी वडगाव सोसायटीच्या निवडणुकीत मात्र एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसने पसंत केले. सोसायटीचे अध्यक्षपद एक वर्ष राष्ट्रवादीकडे तर एक वर्ष भाजपकडे असा समझोता देखील या निवडणुकीत झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.