Maval : श्री कृष्णराव भेगडे विद्या प्रतिष्ठानची नवीन कार्यकारणी जाहीर

एमपीसी न्यूज – मावळ (Maval) तालुक्यातील साहित्यिक, संशोधक व विद्यार्थी यांच्या कार्याला आर्थिक व शैक्षणिक सहाय्य करण्यासाठी श्री कृष्णराव भेगडे विद्या प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे. प्रतिष्ठानची नवीन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. अध्यक्ष मावळभूषण माजी आमदार कृष्णराव भेगडे, तर उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सुरेश साखवळकर आहेत.
खजिनदार उद्योजक नंदकुमार शेलार, सचिव पत्रकार वसंतराव भेगडे, सदस्य म्हणून ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक बाळासाहेब जांभुळकर, साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, इतिहास प्रेमी डाॅ प्रमोद बोराडे यांचा कार्यकारिणीत समावेश आहे.
समाज सदैव उन्नत झाला पाहिजे. तरूणांनी समाजाच्या प्रगतीसाठी नेहमी तत्पर असले पाहिजे. त्यांनी विद्येच्या क्षेत्रात प्रगती करावी. साहित्यिकांनी संशोधनात्मक पद्धतीने रचनात्मक लेखन करावे. यासाठी या सर्व तरूणांना आर्थिक प्रोत्साहन मिळावे म्हणून या प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सुरेश साखवळकर यांनी दिली.
या निमित्ताने प्रतिष्ठानचे अध्यक्ष मावळभूषण, माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी आपल्या 88 व्या वाढदिवसानिमित्त पाच लाख रूपयांचा धनादेश साखवळकर यांच्याकडे सुपूर्द केला. याचवेळी श्री कृष्णराव भेगडे विद्या प्रतिष्ठानची कार्यकारणी जाहिर करण्यात आली. या निमित्ताने साहित्यिक व शिक्षण क्षेत्रातील तरूणांना नवीन चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.