Bhosari : भोसरीतील विकासकांना पालिकेने धाडल्या नोटीसा

अटी-शर्तींचे पालन न केल्यास बांधकाम परवाना रद्द करण्याचा इशारा

एमपीसी न्यूज – बांधकाम व्यावसायिकांनी सदनिकाधारकांशी केलेल्या करारनाम्यातील नमूद तरतुदी, अटी व शर्तीचे पालन करावे. पालन न केल्यास महापालिकेमार्फत गृहप्रकल्पास देण्यात आलेली बांधकाम परवानगी रद्द करण्यात येणार असल्याच्या नोटीसा महापालिकेने भोसरी मतदार संघातील विकासकांना दिल्या आहेत. यामुळे बांधकाम व्यावसायिकांना चांगलाच दणका बसला आहे. त्यामुळे विकासकांना आता अटी-शर्तीचे पालन करावे लागणार आहे.

अनेक बांधकाम व्यावसायिकांकडून गृहप्रकल्पातील नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जात नाही. असे असतानाही महापालिकेकडून व्यावसायिकांना सर्व परवानग्या दिल्या जात होत्या. त्यामुळे विकसकांकडून आश्वासनाची पूर्तता केली जात नव्हती. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक आणि सोसायटीतील नागरिकांमध्ये वारंवार वादविवाद होत असत. यामध्ये तोडगा काढण्यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी बांधकाम परवानगी विभागाचा आढावा घेतला.

बांधकाम व्यावसायिकांकडून गृहप्रकल्पातील नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली आहे की नाही, याची तपासणी महापालिकेकडून करण्यात यावी. ज्या विकासकांनी पूर्तता केली नाही, अशा विकासकांना नोटीसा देण्यात याव्यात. त्यांचा बांधकाम व्यवसायाचा परवाना रद्द करण्यात यावा, असे आदेश लांडगे यांनी अधिका-यांना दिले आहेत. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून महापालिकेने विकासकांना नोटीसा देण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. भोसरी मतदार संघातील सुमारे 20 ते 25 विकासकांना नोटीस बजाविण्यात आली आहे.

विकासकांनी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतल्यानंतर संबंधित नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविणे, ना-हरकत दाखल्यातील अटी व शर्तीनुसार सुविधा पुरविणे बंधनकारक आहे. त्यात कोणतीही कसूर होता कामा नये. विकासकांनी सदनिकाधारक यांच्याशी केलेल्या करारनाम्यातील तरतुदीप्रमाणे सुविधा त्वरित पुरविण्यात याव्यात. सदनिकाधारकांना आवश्यक मुलभूत सोयी-सुविधा, महापालिकेतील इतर संबंधित विभागाकडील ना-हरकत दाखल्यातील अटींची पूर्तता करावी. आवश्यक त्याठिकाणी परिस्थितीनुसार उपाययोजना कराव्यात. यामध्ये हलगर्जीपणा होता कामा नये. तसेच केलेल्या उपाययोजनांची माहिती वेळोवेळी संबंधित विभागास अवगत करावी.

महापालिकेच्या संबंधित विभागाकडील ना-हरकत दाखल्यातील अटी व सदनिकाधारकांशी केलेल्या करारनाम्यातील तरतुदी, अटी व शर्तीचे पालन करावे. अन्यथा महापालिकेमार्फत या प्रकल्पास देण्यात आलेली बांधकाम परवानदी रद्द करण्यात येईल, असे नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

आमदार महेश लांडगे म्हणाले, “बांधकाम व्यावसायिकांकडून गृहप्रकल्पातील नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जात नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे व्यावसायिक आणि सदनिकाधारकांमध्ये वारंवार वादविवाद होण्याचे प्रकार घडत होते. त्यासाठी व्यावसायिकांनी दिलेल्या अटी-शर्तीचे पालन केल्यानंतरच त्यांना बांधकाम पूर्णत्वाचा परवाना देण्यात येणार आहे. तसेच आश्वासनांची पूर्तता न करणा-या व्यावसायिकांचा परवाना रद्द केला जाणार आहे. यामुळे व्यावसायिक नागरिकांची फसवणूक करणार नाहीत. दिलेल्या अटी-शर्तींचे पालन करतील. त्यामुळे वाद-विवादाचे प्रसंग घडणार नाहीत”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.