Pimpri : पन्नास हजार खिळ्यांपासून झाडांची सुटका; अंघोळीची गोळी संस्थेचा उपक्रम

जनजागृतीसाठी काढलेल्या खिळ्यांच्या प्रदर्शनासाठी गणेश मंडळांनी पुढाकार घेण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – विविध कारणांसाठी झाडांमध्ये ठोकलेले तब्बल 49 हजार 397 खिळे काढण्यात आले आहेत. मागील पाच महिन्यापासून अंघोळीची गोळी या संस्थेच्या वतीने ‘खिळेमुक्त झाडं’ हा उपक्रम सुरु आहे. या उप्रक्रमात विविध सामाजिक आणि पर्यावरणप्रेमी संस्था आणि नागरिकांनी सहभाग नोंदविले आहेत. पाच मिलीमीटर पासून ते सहा इंचांपर्यंतचे खिळे झाडांमधून काढून झाडांना वेदनामुक्त करण्यात आले आहे.

1 मार्च 2018 पासून खिळेमुक्त झाडं हा उपक्रम सुरु करण्यात आला. शहरातील विविध सामाजिक आणि पर्यावरण प्रेमी संस्थांना व नागरिकांना या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. नागरिकांनी देखील या उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून झाडांना वेदनामुक्त करण्यात आपला सहभाग नोंदवला. मागील पाच महिन्यात काढलेले सर्व खिळे संस्थेने साठवून ठेवले आहेत. झाडांच्या अस्तित्वामुळे मानवाचे अस्तित्व सुरक्षित आहे. त्यामुळे त्यांच्या अस्तित्वासाठी मानवानेच प्रयत्न करायला हवे, या उद्देशातून हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

संस्थेने काढलेल्या खिळ्यांचे प्रदर्शन तसेच याबाबतची जनजागृती करण्यासाठी येत्या गणपती उत्सवात विविध गणेश मंडळांनी पुढाकार घ्यायला हवा. जी गणेश मंडळे यासाठी तयार होतील त्यांना अंघोळीची गोळी संस्थेच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्यात येणार आहे. झाडांचे दुःख समाजाला समजावे, हा यामागील उद्देश आहे. यासाठी प्राजक्ता रुद्रवार (97654 96858), सचिन काळभोर (99212 50123) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.