Nigdi Accident : निगडीमध्ये झालेल्या अपघाताप्रकरणी मनपाच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

एमपीसी न्यूज : आज दुपारी दुर्गानगर (Nigdi Accident) चौकात झालेला अपघातात एका इसमाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष बाबा परब यांनी केली आहे.

आज दुपारी सव्वा एकच्या सुमारास एक ट्रक त्रिवेणीनगर चौकातून भोसरीकडे जात असताना दुर्गानगर चौकात दुचाकीस्वाराला चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला. या दुचाकीस्वाराचे वय अंदाजे 24 वर्षे होते. त्रिवेणीनगर चौक ते दुर्गानगर चौकमधील खड्ड्यांमुळे वाहन चालक व नागरिक त्रस्त झाल्याने 16 डिसेंबर रोजी खड्ड्यात बसून आंदोलनही करण्यात आले होते. त्याचे सविस्तर वृत्त एमपीसी न्यूजने प्रसिद्धही केले होते.

सविस्तर वृत्त – Nigdi News : त्रिवेणीनगर चौक ते दुर्गानगर चौक परिसरातील खड्ड्यांमुळे वाहन चालक व नागरिक त्रस्त

निगडीमधील त्रिवेणीनगर चौक ते दुर्गानगर चौक हा खूप जास्त रहदारीचा रस्ता आहे. आकुर्डी, चिंचवड व आसपासच्या परिसरातून नागरिक व वाहने तळवडे एमआयडीसी व आयटी पार्कमधील तसेच चाकण एमआयडीसीमधील कंपनीमध्ये कामासाठी कर्मचारी मोठ्या प्रमाणात जातात. तसेच, या कंपन्यांच्या बस व मालवाहतूक करणाऱ्या ट्रक्स व कंटेनर्सची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. त्यामुळे (Nigdi Accident) येथे सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडी होत असते.

हा रस्ता पूर्णपणे उखडला गेल्यामुळे मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. तसेच, वाहने धिम्या गतीने चालत असल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा असतात.

या समस्येवर बाबा परब म्हणाले की, “या मुख्य रस्त्यावर गेले 6 महिने खड्डे आहेत. यामुळे झालेल्या अपघातात चार वाहन चालकांचे पाय मोडले आहेत. या खड्ड्यांच्याबाबत पिंपरी चिंचवड मनपाच्या सारथीवर 2 महिन्यापूर्वी तक्रार केली होती. पण, काहीच झाले नाही. त्यामुळे मी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता व खड्ड्यात बसून 15 दिवसांपूर्वी आंदोलन केले. त्यावेळेस मला मनपाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले होते, की खड्डे लगेच बुजवून घेऊ. पण, आज दुपारपर्यंत खड्डे बुजविण्यात आले नाहीत. ”

परब पुढे म्हणाले, की ”मनपाच्या रस्त्यांचे काम चालू आहे. त्यामुळे पाईप वा राडारोडा रस्त्यावर पडला आहे. रस्ता अरुंद झाला आहे. यामुळे आजचा अपघात होऊन एका युवकाचा मृत्यू झाला. त्यामुळे पिंपरी चिंचवड मनपाच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा व त्याला शिक्षा व्हावी. यापूर्वी येथे चार दुचाकीस्वारांचे अपघातात पाय मोडले आहेत.

स्थानिक नागरिक अशोक वाळके पाटील म्हणाले, की हा रस्ता उखडला असल्यामुळे दुचाकी वाहने अदळतात व पडतात. त्यामुळे अपघात होऊन बरेच दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. हा मुख्य रस्ता असल्याने येथे सकाळी 8 वाजता ते रात्री 10 वाजेपर्यंत वाहतूक कोंडी असते. गेल्या कित्येक वर्षामध्ये हजारो अपघात दुर्गा नगर चौकात झालेले आहेत. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक यामध्ये स्त्री पुरुष यांचा समावेश असून ते अपघातात मृत्युमुखी पडले आहेत. मनपाने यावर काही ठोस उपाय शोधला पाहिजे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की निगडमधील टिळक चौक ते त्रिवेणीनगर चौकापर्यंत अर्बन स्ट्रीट डिझाईन प्रमाणे रस्ता व पदपथ करत आहोत. हेच काम पुढे दुर्गानगर चौकापर्यंत करत आहोत. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी बीबीएम केले आहे. डांबरीकरण बाकी आहे. पुढच्या मंगळवारी डांबरीकरण करण्यास सुरुवात होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.