Nigdi : आईशी हुज्जत घालण्यापासून रोखणाऱ्या बहिणीवर कोयत्याने वार; भावाला अटक

एमपीसी न्यूज – आईशी हुज्जत घालून तिला शिवीगाळ करणा-या भावाला जाब विचारला असता चिडलेल्या भावाने बहिणीवर कोयत्याने वार करून जखमी केले. तसेच दुस-या बहिणीला मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 4) दुपारी चारच्या सुमारास ओटास्किम निगडी येथे घडली. याबाबत मारहाण करणा-या भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलिसांनी भावाला अटक केली आहे.

दिलदार उर्फ नसरुद्दीन शबू खान (वय 26, रा. दळवीनगर, ओटास्किम निगडी) असे अटक झालेल्या भावाचे नाव आहे. याप्रकरणी करिष्मा शबू खान (वय 21, रा. दळवीनगर, ओटास्किम निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी चारच्या सुमारास फिर्यादी करिष्मा, त्यांच्या आई शमा, बहीण निशा आणि आरोपी भाऊ असे चौघेजण बोलत होते. त्यावेळी दिलदार याने आईला शिवीगाळ केली. त्यामुळे करिष्मा यांनी त्याला शिव्या देण्याचा जाब विचारला. यावरून चिडलेल्या दिलदार याने करिष्मा यांनाही शिवीगाळ करत लोखंडी कोयत्याने पायावर वार केले. दिलदार याने करिष्मा यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच बहीण निशा यांनाही मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. निगडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक मोरे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.