Nigdi crime News : दगडाने ठेचून भावाचा खून करणाऱ्या आरोपी भावाला तीन दिवसांची पोलीस कोठडी

एमपीसी न्यूज – सख्ख्या भावाने लहान भावाच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर दगडाने मारून त्याचा निर्घृणपणे खून केला. ही घटना बुधवारी (दि. 2) रात्री दहा वाजता खान्देश मराठा मंडळाच्या कार्यालयाजवळ निगडी येथे घडली. निगडी पोलिसांनी आरोपी मोठ्या भावाला अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

सोमनाथ सुरेश नाईकवडे (वय 40) असे अटक केलेल्या आरोपी भावाचे नाव आहे. विश्वनाथ सुरेश नाईकवडे (वय 35, रा. चिकन चौक, ओटास्कीम, निगडी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत या दोघांची आई सखुबाई सुरेश नाईकवडे (वय 65) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोमनाथ आणि मयत विश्वनाथ हे सख्खे भाऊ आहेत. सोमनाथ आणि विश्वनाथ या दोघांना दारूचे व्यसन आहे. त्यावरून सोमनाथ आणि मयत विश्वनाथ यांच्यात वारंवार भांडण होत होते. बुधवारी रात्री काचघर चौक, निगडी येथे विश्वनाथ याने सोमनाथला दारू पिऊन मारहाण केली. याचा राग सोमनाथच्या मनात होता.

त्यातूनच बुधवारी रात्री निगडी, प्राधिकरण येथील खान्देश मराठा मंडळाजवळ साफल्य बंगल्यासमोरून जात असताना रस्त्याच्या दुभाजकावर विश्वनाथ आणि सोमनाथ यांचे पुन्हा भांडण झाले. यात सोमनाथने लहान भावाचा चेहरा आणि डोके दगडाने ठेचत त्याचा खून केला.

आरोपी आणि मयत यांचे घर अतिशय लहान आहे. त्यामुळे सोमनाथ आणि विश्वनाथ घराबाहेर कुठेही झोपत असत. दोघेही कचरा वेचकाचे काम करत होते.

खून केल्यानंतर सोमनाथ झोपण्यासाठी बिजलीनगर, चिंचवड येथे निघून गेला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीच्या शोधात दोन पथके रवाना केली. सहा तासात निगडी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.

पोलिसांनी आरोपी सोमनाथ याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस उपनिरीक्षक महेंद्र आहेर तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.