Nigdi : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त ढोल-ताशा पथकांची मानवंदना

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक (Nigdi) वर्षानिमित्त अखिल पिंपरी चिंचवड शिवजयंती समन्वय समिती, ढोल ताशा महासंघ महाराष्ट्र राज्य पिंपरी-चिंचवड विभाग, तसेच पिंपरी चिंचवड शहर व मावळ तालुका यातील ढोल-ताशा वाद्य पथके यांच्या वतीने 35 मिनिटे 350 ढोल ताशा वाजवून अनोखी मानवंदना देण्यात आली. भक्ती शक्ती शिल्प समूह येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मातीला नमन आणि वीरांना वंदन करण्यासाठी काल भव्य सामुहिक पंचप्राण शपथेचे तसेच अमृत कलश यात्रा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
“भारताची एकात्मता बलशाली आणि देशाचे संरक्षण करणा-यांप्रती सन्मान बाळगू, भारतास २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न साकार करू, गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू, देशाच्या समृद्ध वारसाचा गौरव करू तसेच देशाचे नागरिक म्हणून आम्ही सर्व कर्तव्यांचे पालन करू ” अशी सामुहिक पंचप्राण शपथ पन्नास हजाराहून अधिक शिवप्रेमी, देशप्रेमी आणि नागरिकांनी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत घेतली.
महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात येत असलेल्या माझी माती, माझा देश कार्यक्रमांमध्ये तसेच महापालिकेच्या इतरही कार्यक्रमांमध्ये शहरातील नागरिक उत्स्फुर्तपणे सहभागी होत असल्याबद्दल आयुक्त शेखर सिंह यांनी शहरवासियांचे (Nigdi) आभार व्यक्त केले.