Nigdi: मनसेतर्फे मोफत ‘मास्क’, ‘सॅनिटायझर’चे वाटप  

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी मनसेचे शहराध्यक्ष व गटनेते सचिन चिखले यांनी पुढाकार घेऊन प्रभाग क्रमांक 13 निगडी गावठाण परिसरात नागरिकांना मोफत सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले. तसेच कोरोना या विषाणूबाबत घ्यावयाच्या खबरदारीची माहितीही नागरिकांना यावेळी दिली. ‘कोरोना’ हा विषाणू जीवघेणा नाही. परंतु, नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहनही चिखले यांनी केले.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब गायकवाड, हौसराव शिंदे, विजय साळवे, अमित भालेराव, शैलेश पाटील, रोहित काळभोर, अन्वर अंसारी, जय सकट, प्रदीप घोडके, महेश माने (अक्कलकोट), संतोष होटकर, रोहित चव्हाण, नियाज खान, जाकीर शेख, श्रावण गोयल, विनायक लिंबाळकर, प्रबुद्ध कांबळे, गणेश उज्जैनकर, नगरसेवक सचिनभाऊ चिखले मित्र मंडळ, निगडी गावठाण मित्र मंडळ, वॉर्डातील सर्व पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व समस्त निगडी गावठाणमधील नागरिक उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना या संसर्गजन्य विषाणूने थैमान घातले आहे. त्यावर अद्याप कोणतीही लस विकसित झाली नाही. त्यामुळे शहरातील नागरिक चिंतातूर आहेत. या विषाणूपासून स्वतःचा बचाव कसा करावा या संभ्रमावस्थेत आहेत. मात्र, तज्ञांनी या विषाणूला घाबरण्याची आवश्यकता नसून, हातांची स्वच्छता व तोंडाला मास्क लावून या विषाणूपासून स्वतःचा बचाव करता येतो, असे सांगितले आहे. शहरात मास्क व सॅनिटायझरचा तुटवडा आहे. त्यामुळे शहरातील बरेचसे नागरिक या सुविधांपासून वंचित आहेत. अशाने हा जंतूसंसर्ग आणखी पसरण्याचा धोका आहे. हा संभाव्य धोका ओळखून मनसेतर्फे  मोफत सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका विविध पातळीवर प्रयत्न करीत आहे. वेगवेगळ्या स्तरावर शहरात जनजागृतीचे काम सुरु आहे. नागरिकांनी या आजाराची भीती बाळगू नये. आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच महापालिकेने वारंवार केलेल्या सूचनांनुसार स्वच्छता राखणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे तसेच हस्तांदोलन टाळणे अशा प्राथमिक गोष्टी नागरिकांनी कराव्यात, असे आवाहन चिखले यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.