Nigdi News: कंत्राटी पद्धतीने काम करणारे कोरोना योद्धे पगारापासून वंचित, 35 कर्मचा-यांचे आजपासून काम बंद आंदोलन

एमपीसी न्यूज – कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यमुनानगर झोनमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणा-या डॉक्टर, स्टाफनर्स यांचा दोन महिन्यांपासून पगार झाला नाही. पगारासाठी ठेकेदाराकडून दररोज वेगवेगळ्या तारखा दिल्या जातात. त्यामुळे डॉक्टर, स्टाफ नर्स अशा 35 कंत्राटी कर्मचा-यांनी आजपासून काम बंद आंदोलन केले आहे. त्यामुळे यमुनानगर रुग्णालयातील लसीकरण, कोरोना चाचण्याच्या कामाचा खोळंबा झाला आहे.

महापालिकेने कोरोनाच्या पहिल्या, दुस-या लाटेत डॉक्टर, स्टाफनर्स यांना मानधनावर घेतले होते. त्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने विविध रुग्णालयांना मेडिकल, पॅरामेडिकल कर्मचारी पुरविण्यासाठी ठेकेदार नेमले. त्यांच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने कर्मचारी घेण्यास सुरुवात केली. निगडी, यमुनानगर झोनमध्ये ठेकेदाराच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने 35 लोक काम करत आहेत.

11 डॉक्टर, स्टाफनर्स यांचा समावेश आहे. या 35 कर्मचा-यांचा नोव्हेंबर 2021 पासूनचा पगार झाला नाही. दररोज नवीन तारीख सांगितली जाते. 1 जानेवारीला पगार होईल असे सांगितले. पण, 11 तारीख आली तरी पगार झाला नाही. फोन केला तर उद्धटपणे उत्तरे दिली जातात. आम्हाला तुमची गरज नाही. आमचे काम चालू राहते असे बोलले जाते. कामावरुन काढून टाकण्याची धमकी दिली जाते. अजूनही पगार झाला नाही. 11 डॉक्टर, स्टाफ नर्स, एनएम, डेटा एंट्री ऑपरेटर अशा 35 कर्मचा-यांनी आजपासून कामावर जाणे बंद केले. जोपर्यंत पगार होत नाही. तोपर्यंत कामावर जाणार नसल्याचे एका कर्मचा-यांने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

कोरोनाची भिती न बाळगता आम्ही काम करतो. लसीकरण केंद्राची आमच्यावर जबाबदारी आहे. ओपीडीही बघतो. टेस्टिंगचे कामही आम्हीच करतो. जीव धोक्यात घालून काम करत असताना नोव्हेंबरपासून आमचा पगार झाला नाही. ठेकेदारावर पालिकेचे काहीच नियंत्रण नाही. पगार मागितल्यास उद्धटपणे उत्तरे दिली जातात. याबाबत महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी यांना पत्र दिले. पण, त्यांनी पत्रही स्वीकारले नाही. त्यामुळे आम्ही आजपासून काम बंद केल्याचे एका डॉक्टरने सांगितले.

अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे म्हणाले, ”मेडिकल, पॅरामेडिकल कर्मचारी पुरविण्यासाठी नेमलेल्या ठेकेदारांवर महापालिकेचे नियंत्रण असते. त्यासाठी शासकीय नियमांप्रमाणे ठेकेदाराकडून डिपॉझिटची गॅरंटी घेतलेली असते. काही अडचण आल्यास कर्मचा-यांना पगार देण्यासाठी गॅरंटी घेतली जाते. याप्रकरणाची माहिती घेऊन संबंधितांना सूचना दिल्या जातील”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.