Chikhali News : देवघरातील वात उंदराने पळवल्याने घरात लागली आग

एमपीसी न्यूज – देवघरात लावलेल्या दिव्याची वाट उंदराने पळवली. या पेटत्या वातीमुळे घरात आग लागली. यामध्ये घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. ही घटना रविवारी (दि. 9) सायंकाळी कासारिया सोसायटी, नेवाळेवस्ती, चिखली येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, नेवाळेवस्ती येथे कासारिया सोसायटीमध्ये रविवारी सायंकाळी एका फ्लॅटमध्ये देवघरात दिवा लावला होता. फ्लॅटमध्ये उंदीर असल्याने उंदराने दिव्यातील पेटती वात पळवली. मात्र पेटत्या वातीची ठिणगी लागल्याने घरात आग लागली. यावेळी खोलीत 13 वर्षांचा मुलगा होता. त्याने आरडाओरडा केल्याने हॉलमध्ये बसलेल्या घरातील इतर सदस्यांच्या हा प्रकार निदर्शनास आला.

आग लागल्याचे समजताच सर्वांची धावपळ उडाली. त्यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेत काम करणारा एक कर्मचारी सोसायटी जवळून जात होता. या कर्मचा-याने सोसायटीमधील अग्निशामक यंत्रणा सुरु केली. त्यांनतर नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीमध्ये घरात सुमारे 50 हजारांचे नुकसान झाले आहे.

घरात कुणीही नसताना दिवे लावून ठेऊ नयेत. तसेच घरात उंदीर असतील तर त्याचा वेळीच बंदोबस्त करावा. सोसायटीमधील अग्निशामक यंत्रणा सुरु असल्याची खात्री करावी, त्याची देखभाल करावी, असे आवाहन अग्निशामक यंत्रणेकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.