Nigdi News: सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी कृष्णा पानसे यांचे निधन

एमपीसी न्यूज – कासारवाडी, आकुर्डी रेल्वे स्टेशन निर्मितीमध्ये महत्वाचे योगदान देणारे रेल्वेचे सेवानिवृत्त कर्मचारी कृष्णा विठ्ठल पानसे ( वय 99 ) यांचे वृद्धापकाळाने रविवारी (दि.27) निधन झाले. निगडी, प्राधिकरणातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कृष्णा पानसे मूळचे नाशिक जिल्ह्यातील लासलगावचे होते. रेल्वेच्या कमर्शिअल विभागात प्रदीर्घ सेवा करुन 1980 साली ते सेवानिवृत्त झाले होते. रेल्वे सेवेत असताना कासारवाडी, आकुर्डी रेल्वेस्टेशन निर्मितीसाठी त्यांनी पुढाकार घेत या स्थानकांच्या निर्मितीमध्ये त्यांचे महत्वाचे योगदान आहे.

प्राधिकरण प्रवासी संघ, दुर्गा टेकडी भ्रमण मंडळ, शरयूनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना, सावरकर मंडळाचे माजी कोषाध्यक्ष, संत ग्रंथ अध्यायन मंडळ, सावरकर मंडळाचे ग्रंथालय कृष्णा पानसे यांनी घरातून सुरु केले होते.

निगडी, प्राधिकरणातील राहत्या घरी पानसे यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. पुढील महिन्यात ते शंभराव्या वर्षात पदार्पण करणार होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. आनंद पानसे यांचे ते वडील होत.

निगडीतील अमरधाम स्मशानभूमीत कृष्णा पानसे यांच्या पार्थिवावर आज (सोमवारी) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.