Nigdi News: काँग्रेस स्थापनादिनी युवक काँग्रेसकडून मजुरांना शॉल, मास्कचे वाटप

एमपीसी न्यूज – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 136 व्या स्थापना दिनाचे औचित्य साधत शहर युवक काँग्रेसने ‘रोजदांरी मजूर सेवा’ उपक्रमाचे आयोजन केले. या अंतर्गत मजुरांना थंडी पासून बचावासाठी शॉल व कोरोना पासून बचावासाठी मास्कचे वाटप करण्यात आले.

निगडी येथील ओटा स्कीम येथील कामगार नाका चौक व भोसरी पुलाजवळील चौकातील मजूर अड्डयावर जाऊन युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी मजुरांची भेट घेतली. त्यांना साहित्याचे वाटप केले. मजुरांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व सद्य स्थितीतील अडचणी समजवून घेतल्या.

या बाबत युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, काँग्रेस पक्ष हा भारतीय राजकारणातील सर्वात जुना व 135 वर्षांची त्याग, बलिदान, देशप्रेम व देशाची अंखडता जपण्याची उत्तम परंपरा असलेला मोठा दैदिप्यमान पक्ष आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यापासून ते देश सर्व क्षेत्रात सक्षम व स्वंयपूर्ण करण्यापर्यंतचे संपूर्ण काम करण्यात काँग्रेस पक्षाचा मोठा व अविस्मरणीय वाटा आहे.

काँग्रेसची सर्वधर्मसमभाव, राष्ट्रीय एकात्मता व लोकशाही मूल्ये जपणारी जीवनशैली जमसामान्यांमध्ये आजही तेवढीच खोलवर रूजलेली पाहण्यात येते.

याचे कारण म्हणजे गरीब, शेतकरी, मजूर, कामगार, कष्टकरी, नोकरदार, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, सैनिक, उद्योजकता यांना राजकारणाचा केंद्रबिंदू मानून काँग्रेसने सत्तेतून जनसेवेचे व्रत हाती घेऊन विविध योजना राबविल्या.

महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडित नेहरू, मौलाना अबूल कलाम आझाद, सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी, राजीव गांधी आदी नेते शेवटच्या श्वासापर्यंत देशासाठी व सामान्य माणसांसाठी झटले. त्यांच्या कार्यातूनच प्रेरणा घेऊन व काँग्रेसच्या घोषणा वाक्या प्रमाणे ‘काँग्रेस का हात आम आदमी के साथ’ या प्रमाणे आज काँग्रेस स्थापना दिनी या रोजंदारी मजूरांची सेवा उपक्रमाचे आयोजन केले आहे.

युवक काँग्रेसचे शहर सरचिटणीस विरेंद्र गायकवाड, मिलिंद बनसोडे, अनिल सोनकांबळे, पिंपरी विधानसभा युवकचे अध्यक्ष हिराचंद जाधव, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, अर्णव कामठे, प्रविण जाधव, पांडूरंग वीर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.