Pimpri : ‘इनकमिंग’ची अडचण नाही, शिवसेना-भाजप युती नक्की होणार – चंद्रकांत पाटील

दहा दिवसांत आचारसंहिता लागू होईल

एमपीसी न्यूज – भाजप-शिवसेना दोन्ही पक्षात नेते मोठ्या संख्येने येत आहेत. दोन्ही पक्ष नेत्यांना पक्षात घेत असले. तरी, युती होण्यासाठी कोणतीही अडचण नसून भाजप-शिवसेना युती नक्की होणार, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच आगामी दहा दिवसांत निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्ण झालेल्या विकास कामाचे लोकार्पण करून घेण्याचा सूचनाही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. 

पिंपरी-चिंचवड शहरातील राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांचा पालकमंत्री पाटील यांनी आज (शुक्रवारी) आढावा घेतला. महापालिकेच्या प्रकल्पांची माहिती घेतली.  त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. महापौर राहुल जाधव, भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, पीसीएनटीडीएचे अध्यक्ष सदाशिव खाडे आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, भाजपने आत्तापर्यंत भ्रष्टाचाराचे आरोप असणा-या कोणालाही पक्षात घेतले नाही. आरोप असणारा कोणी जर पक्षात आला. तर, तो पक्षात आल्यामुळे त्याच्यावरील आरोप नष्ट झालेत असे नाही.  दोन्ही पक्ष आपल्याकडे येणा-या लोकांना पक्षात घेत असले. तरीही युती नक्की होईल.

जागा वाटपाचा फॉर्म्युला माझ्या तोंडून खपवू नका!

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती होणार आहे. युतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरला नाही. फॉर्म्युल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मी काहीच बोललो नाहीत. तुम्हाला जे मनायचे आहे. ते तुम्ही (पत्रकार) मुख्यमंत्री, माझ्या नावाने खपविता. जागा वाटपाचा फॉर्म्युला माझ्या तोंडून खपवू नका, असेही पाटील म्हणाले.

न्यायालयाच्या आदेशानुसार अजित पवार यांच्यावर कारवाई!

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील सर्व ‘केसेस’ न्यायालयात सुरु आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही होत असते. न्यायालयाने राज्य सहकारी बँके संदर्भात आदेश दिला. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. जलसंपदा विभागाकडील सर्व विषय न्यायालयात सुरु आहे. न्यायालय जी सूचना करेल. त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल, असेही पाटील म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.