Akurdi News: आता डिजिटल क्रांती आरोग्य क्षेत्रात – डॉ. प्रशांत पानसरे

एमपीसी न्यूज – ”डिजिटल इंडिया’सारख्या विविध उपक्रमांची सुरवात झाल्यापासून गेल्या दोन-तीन वर्षांत भारत हा जगातील सर्वांत स्वस्त मोबाईल इंटरनेट उपलब्ध करून देणारा देश बनला आहे. डिजिटल बँकिंग, फिनटेक आणि डिजिटल रिटेल यांसारख्या पावलांनंतर आता पुढच्या डिजिटल क्रांतीचे क्षेत्र हे आरोग्यसेवा क्षेत्र असणार आहे.

आरोग्य क्षेत्रातील अनेक तपासण्या आणि इतर सेवा या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या मदतीने कमी वेळेत, वाजवी दरांत आणि अधिक परिणामकारक व सोयीस्कर पद्धतीने पोचविणे शक्य होणार आहे. पुढील दोन-अडीच वर्षांत डिजिटल आरोग्य सेवांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळेल,’ असा  अंदाज डेटा सायन्स क्षेत्रातील तज्ज्ञ व उद्योजक डॉ. प्रशांत पानसरे यांनी व्यक्त केला.

डी.वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या (डीवायपीआययू) चतुर्थ स्थापना दिवस कार्यक्रमात सोमवारी (14 मार्च) पानसरे बोलत होते. या वेळी ‘डीवायपीआययू’चे कुलगुरू प्रा. प्रभात रंजन, डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे विश्वस्त तेजस पाटील, डी. वाय. पाटील शिक्षण संकुलाचे संचालक डॉ. नीरज व्यवहारे, ‘ डीवायपीआययू’चे कुलवचिव डॉ. मुकेश पराशर आदी उपस्थित होते.

पानसरे म्हणाले, ‘गेल्या दोन वर्षांत कोविडमुळे आपल्यापुढे उभ्या झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीत अनेक नवनव्या डिजिटल संकल्पनांचा जन्म झाला आणि त्यांचे प्रत्यक्ष कार्यही आपण अनुभवले. यात नवनिंर्मितीचे मूल्य आपणांस जाणवेल. ”फिजिकल’ ते ‘व्हर्च्युअल’ व्हाया डिजिटल’ असा प्रवास आणि त्यातून झालेली स्थित्यंतरे याचे आपण साक्षीदार ठरलो आहोत.’

गेल्या दोन वर्षांत केवळ तंत्रज्ञानच बदलले नाही तर, आपली जीवनशैलीही त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बदलली. फिनटेक कंपन्या आणि देशभरात असंख्य लोकांकडून वापरले जाणारे विविध डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म हे याचेच एक जिवंत उदाहरण आहे. गेल्या दीड वर्षात गुगल पे सारख्या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मवरून भारतीयांनी केलेल्या व्यवहारांचा आकडा तब्बल 44 अब्ज एवढा प्रचंड आहे, असेही पानसरे म्हणाले. प्रा. रंजन यांनी स्वागतपर भाषण केले. या वेळी विद्यार्थ्यांना विविध पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले.

एक शैक्षणिक संस्था म्हणून आपल्या स्थापनेपासूनच ‘डीवायपीआययू’ने नवनवे प्रयोग करण्याचा आणि देशात नवे शिक्षणप्रवाह आणण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या अनेक प्रयोगांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेसारख्या राष्ट्रीय पातळीवरील संस्थांनी देखील पाठिंबा दिला आहे. संशोधन आणि विकासाला डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पुढे नेण्यात शिक्षण क्षेत्राने महत्त्वाचे योगदान देणे येत्या काळात आवश्यक ठरणार आहे, असे  प्रा. प्रभात रंजन म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.