Talegaon News : नववर्षानिमित्त तळेगावच्या कलाकारांकडून रसिकांना मिळणार अनोखी भेट

एमपीसी न्यूज – तळेगाव म्हणजे गुणी संपन्न कलाकार आणि चोखंदळ कलाप्रेमी रसिकांची नगरी. अनेक सांस्‍कृतिक संस्‍थांच्‍या माध्यमातून तळेगावकर कायम दर्जेदार कलांच्या सादरीकरणांचा आस्वाद घेत असतात. पण यावर्षी तळेगाव करांसाठी हे नवीन वर्ष विशेष असणार आहे. कारण गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कलापिनी निर्मित आणि सृजन नृत्यालय प्रस्तुत, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या जीवनावर आधारित दोन अंकी नृत्यनाट्याचं “अमृत संजीवनी”चं दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारण होणार आहे.

अमृत संजीवनी या महानाट्यामध्ये पन्नास कलाकारांचा सहभाग आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा या नाटकाचे प्रयोग कलापिनी सांस्कृतिक केंद्रातर्फे करण्यात आले आहेत. मीनल कुलकर्णी लिखित आणि दिग्दर्शित या महानाट्याचं संगीत दिग्दर्शन विनायक लिमये यांनी केलं आहे. हे प्रसारण म्हणजे नववर्षदिनी तळेगावचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या चरणी कलाकारांनी वाहिलेली कलापुष्पमालाच आहे, अशा भावना कलाकार व्यक्त करीत आहेत.

शुक्रवार (दि. 1) रोजी सायंकाळी साडेसात वाजता, शनिवार (दि. 2) रोजी दुपारी दीड आणि रात्री साडेदहा वाजता, सोमवार (दि. 4) रोजी पहाटे दीड वाजता – असे तीन दिवस हे प्रसारण होणार असल्यामुळे प्रत्येकाला हा कार्यक्रम दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येईल.

या संपूर्ण प्रक्रियेत दूरदर्शनचे मार्गदर्शक नीरज अग्रवाल आणि दूरदर्शन निर्माते निरंजन पाठक यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. कलापिनी आणि सृजन नृत्यालयाने निर्माण केलेला “अमृत संजीवनी”चा हा सांस्कृतिक ठेवा, दूरदर्शनच्या संग्रहालयामध्ये जतन केला जाणे ही तळेगाव करांसाठी निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. हा क्षण तळेगावच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे, अशा शब्दात कलापिनीचे कलाकार आनंद व्यक्त करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.