Pimpri News : सफाई कर्मचाऱ्यांच्या तक्रारींच्या निराकरणासाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती; क्षेत्रीय कार्यालनिहाय तक्रारी घेणार जाणून

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आस्थापनवेरील क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कार्यरत असणा-या आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक सोमवार व शुक्रवारी हे अधिकारी क्षेत्रीय कार्यालयात जाऊन तक्रारी ऐकून घेतील आणि त्या निकाली काढणार आहेत.

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे सुमारे साडेपाच हजार सफाई कर्मचारी आहेत. त्यातील काही महापालिका सेवेतील तर बहुतांश ठेकेदाराकडील आहेत. त्यांची नियुक्ती क्षेत्रीय कार्यालयनिहाय केली आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी क्षेत्रीय कार्यलयस्तरावर दिली आहे. सफाई कर्मचाऱ्यांमार्फत रस्ते, महापालिका मुख्यालयासह विविध विभागीय कार्यालये, क्षेत्रीय कार्यालये, करसंकलन कार्यालये, शाळा, रुग्णालये, दवाखाने, स्वच्छतागृह यांची साफसफाई केली जाते.

या कर्मचा-यांच्या तक्रारी तत्काळ सुटाव्यात यासाठी आरोग्य विभागाचे उपायुक्त संदीप खोत व कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांची नियुक्ती केली आहे. क्षेत्रीय कार्यालयनिहाय दर सोमवार, शुक्रवारी दुपारी बारा ते दोन या वेळेत तक्रारी ऐकून घेऊन, त्यांचे निराकरण केले जाईल. त्याचा अहवाल अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे द्यायचा आहे.

महिन्याचा पहिला आठवडा अ व ब क्षेत्रीय कार्यालय, दुसरा आठवडा क व ड कार्यालय, तिसरा आठवडा इ व फ कार्यालय आणि चौथा आठवडा ग व ह कार्यालय, असे सफाई कर्मचाऱ्यांच्या तक्रारींच्या निराकरणाचे नियोजन केले आहे. यावेळी संबंधित क्षेत्रीय अधिकारी व आरोग्य अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आयुक्त राजेश पाटील यांनी काढलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.