Chakan Crime News : पेट्रोल पंपाची 11 लाख रुपयांची लुटली रोकड

एमपीसी न्यूज – पेट्रोल पंपावर जमा झालेली रोकड बँकेत भरण्यासाठी महिला कर्मचारी दुचाकीवरून जात असताना रस्त्यात बळजबरीन तब्बल 10 लाख 97 हजारांची रोकड चोरट्यांनी पळवली. पुणे नाशिक महामार्गावर एकतानगर (चाकण, ता.खेड ) सोमवारी (दि.28 मार्च ) सकाळी अकराच्या सुमारास हा थरार घडला. रोकड ताब्यात घेतल्यानंतर एकाच दुचाकीवरून आलेले दोन चोरटे भरधाव दुचाकीवरून पुणे बाजूकडे पसार झाले आहेत.

भर दिवसा रहदारीच्या वेळी हा प्रकार घडल्यामुळे परिसरात गोंधळ उडाला होता. या प्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पेट्रोल पंपावरील महिला कर्मचारी शिवानी गणेश मगर ( वय 24, रा. चाकण ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, चाकण पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे व सहा. पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण जवळील एच पी कंपनीच्या सुमन पेट्रोल पंपावर शिवानी कामास आहेत. पंपावर दररोज जमा केलेली रोकड बँकेत भरली जाते. पेट्रोल पंपावर जमलेली रोकड चाकण मधील एसबीआय बँकेत भरण्यासाठी फिर्यादी मगर या पंपावरील एका कर्मचार्याला सोबत घेऊन दुचाकीवरून जात होत्या.

पुणे नाशिक महामार्गावर एकतानगर भागात पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी अचानक त्यांच्या दुचाकी जवळ आल्यानंतर आपल्या दुचाकीचा वेग कमी केला. व फिर्यादी मगर यांच्या हातातील 10 लाख 97 हजारांची रोकड असलेली बॅग हिसकवली व दुचाकीवरून भरधाव वेगात पुणे बाजूकडे पसार झाले. त्यानंतर फिर्यादी मगर यांनी पेट्रोल पंपाचे अधिकारी, मालक व पोलिसांना माहिती दिली. भररस्त्यात व रहदारी असणार्‍या ठिकाणी हा प्रकार घडल्यानंतर नागरिकांनी मोठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच चाकण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली. या प्रकरणी अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड व त्यांचे सहकारी करत आहेत.

पाळत ठेऊन लुट?

पंपावर जमलेली रोकड दररोज बँकेत भरली जाते. याची माहिती घेऊन आणि रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने सोमवारी दोन दिवसांची रोकड अधिक असणार याची खात्री करून चोरट्यांनी पाळत ठेवून ही रोकड लुटली असण्याचा संशय व्यक्त होत आहे. चोरटे परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाले असण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.