Vilas lande: निमित्त वाढदिवसाचे लक्ष्य लोकसभेचे!

विलास लांडे यांची वाढदिनी शिरूर मतदारसंघात फलकबाजी

एमपीसी न्यूज – भोसरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे (Vilas lande) यांनी वाढदिवसाचे निमित्त साधून शिरूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा उतरण्याची तयारी सुरू केली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघानिहाय लागलेल्या प्रत्येक फलकांवर संसदेचे चित्र वापरण्यात आले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीसाठी लांडे यांनी आतापासूनच शड्डू ठोकल्याचे दिसते. विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे हे पुन्हा शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढतीलच अशी शक्यता नाही. त्यामुळे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील किंवा लांडे या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळू शकते.

Talegaon : सोमाटणे टोल नाक्यासंदर्भात राज्य शासनाने भूमिका स्पष्ट करावी

पिंपरी-चिंचवड शहरातील मुरब्बी राजकारणी म्हणून लांडे यांच्याकडे पाहिले जाते. शहरातील शरद पवार असेही लांडे यांना म्हटले जाते, एवढे धूर्त राजकारणी ते आहेत. त्यांना घरातूनच राजकीय वारसा लाभला आहे. त्यांचे वडील नगरसेवक होते. ते स्वतः आणि त्यांच्या पत्नी मोहिनी लांडे यांनी शहराचे महापौरपद भूषविले आहे. हवेली आणि भोसरीचे लांडे यांनी विधानसभेत प्रतिनिधित्व केले.

विलास लांडे (Vilas lande) यांनी 2009 मध्ये शिरूर मधून लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढविली. पण, त्यात त्यांचा पराभव झाला. 2014 मध्ये भोसरी विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादीकडून लढविली. त्यात त्यांचा पराभव झाला. 2019 मध्ये भोसरीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठींब्यावर अपक्ष निवडणूक लढल्यानंतरही त्यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. विधानसभेला दोनवेळा आणि लोकसभेला एकदा असे तीनवेळा लांडे यांना पराभव पहावा लागला.

शिरूरमधून 2019 ची लोकसभा निवडणूक लढविण्याची पूर्ण तयारी लांडे यांनी केली होती. पण, ऐनवेळी डॉ.अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आणि त्यांना उमेदवारी मिळाली. आता 2024 ची लोकसभा निवडणूक डॉ.कोल्हे शिरूरमधून लढतीलच असे नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सक्षम उमेदवार आवश्यक आहे. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे वाढदिवसाचे निमित्त साधून लांडे यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात सर्वत्र शुभेच्छा फलक झळकले आहेत. प्रत्येक फलकावर संसदेचे चित्र वापरण्यात आले आहे. सामान्यांशी घट्ट जोडलेले नेतृत्व, धडाडीचा नेता असा मजकूर फलकांवर आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे फोटो फलकांवर आहेत. त्यामुळे वाढदिवसाचे निमित्त साधून लांडे यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे.

डॉ.कोल्हे राष्ट्रवादीकडून लढतात की माघार घेतात, भाजपमध्ये जात निवडणूक रिंगणात उतरतात यावर बरीच पुढील गणिते अवलंबून असतील. डॉ. कोल्हे लढणार नसतील तर वळसे पाटील यांच्या नावाचा प्राधान्याने विचार होऊ शकतो. पाटील यांचा वयाचा आणि आजार पणाचा विचार करता ते दिल्लीत जाण्यास पसंती देतील की नाही या गणितावर पुन्हा एकदा लांडेवाडी विरुद्ध लांडेवाडी अशी लढत पहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तूर्तास तरी लांडे यांनी वाढदिवसानिमित्त लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी शड्डू ठोकले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.