Pune : आता केवळ 11 दिवसांत होणार पोलिसांकडून पासपोर्ट पडताळणी

एमपीसी न्यूज- पासपोर्ट कार्यालयाकडून पासपोर्ट देण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर पोलिसांकडून करण्यात येणा-या पडताळणीसाठी 1 ते 2 महिन्यांचा कालावधी लागत होता. त्यानंतर हा कालावधी कमी होऊन 36 दिवसांवर आला. परंतु पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी हा कालावधी आणखी कमी करणाच्या सूचना दिल्या. या सूचनेनंतर केवळ 11 दिवसांवर पडताळणीचा कालावधी आणण्यात पोलिसांच्या विशेष शाखेला यश आले आहे.

येत्या काही दिवसांमध्ये 10 दिवसांच्या आत पासपोर्ट पडताळणी करण्याचे उद्दिष्ट पोलिसांनी ठेवले आहे.

नियमाप्रमाणे पोलिसांनी पासपोर्ट संदर्भातील पडताळणी 21 दिवसांमध्ये करणे बंधनकारक आहे. परंतु पासपोर्टसाठी दाखल होणा-या पासपोर्ट अर्जांची संख्या अधिक असल्याने 21 दिवसांमध्ये पडताळणी करणे शक्य होत नव्हते. जुलै महिन्यापर्यंत पासपोर्ट पडताळणीसाठी 36 दिवसांचा कालावधी लागत होता तो आता 11 दिवसांवर आणण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी पोलीस अधिका-यांची बैठक घेऊन केलेल्या मार्गदर्शनामुळे केवळ 11 दिवसांवर पडताळणीचा कालावधी आणण्यात पोलिसांच्या विशेष शाखेला यश आले आहे. 1 जानेवारी 2018 ते 1 ऑक्टोबर 2018 या कालावधीत पासपोर्टसाठी तब्बल 9 लाख 38 हजार 678 इतके अर्ज आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.