PCET University : शैक्षणिक वैभवात भर; ‘पीसीईटी’ला विद्यापीठाचा दर्जा

एमपीसी न्यूज – पिंपरी- चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET University) वतीने उभारलेल्या शैक्षणिक संकुलास ‘पिंपरी-चिंचवड विद्यापीठ, पुणे’ अशा स्वतंत्र विद्यापीठास राज्य सरकारने मान्यता दिल्याने शहरातील शैक्षणिक वैभवात भर पडली आहे. 2023-24 या नवीन शैक्षणिक वर्षात विद्यापीठ सुरु होणार आहे.

औद्योगिकनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात देशाच्या आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक नोकरी आणि व्यवसायाच्या निमिताने येतात. बेस्ट सिटी, स्मार्ट सिटी, मेट्रो सिटी असा शहराचा विकास होत असताना शहरात स्वतंत्र असे विद्यापीठ नव्हते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम शिक्षण संस्थांच्या वतीने चालविले जात होते. त्यानंतर गेल्या पंचवीस वर्षांपूर्वी डॉ. डी. वाय. पाटील आणि सिम्बॉयसीस या अभिमत विद्यापीठाच्या माध्यमातूनही पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम चालविले जात होते.

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या 27 लाखांवर पोहोचली आहे. शहरात प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालये, वरिष्ठ महाविद्यालये, तसेच उच्च आणि तंत्रशिक्षण देणाऱ्या अशा सुमारे साडेसातशे शिक्षण संस्था आहेत. यातील बहुतांश संस्था पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून अभ्यासक्रम चालविले जात होते. या संस्थामध्ये मावळ, मुळशी आणि खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यांतून शिक्षणासाठी मुले पिंपरी-चिंचवडमध्ये येत असतात. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र विद्यापीठाची (PCET University) मागणी केली जात होती.

Pimpri News : नवीन पोलीस आयुक्तांनी स्वीकारला पदभार

पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून वडगाव मावळ येथे शैक्षणिक संकुल उभारले आहे. स्वयं अर्थसाहाय्य विद्यापीठ मान्यतेसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे हा प्रस्ताव सादर केला होता. ट्रस्ट गेली 30 वर्षांपासून शहरामध्ये शैक्षणिक सेवा देण्याचे कार्य करीत आहे. वडगाव मावळ येथील सातेगाव येथे 10 एकर जागेत हे विद्यापीठ उभारले आहे. स्वयंसाह्यता निधीअंतर्गत पिपरी- चिंचवड विद्यापीठ पुणे यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. 2023-24 या शैक्षणिक आर्थिक वर्षात विद्यापीठ सुरु करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई म्हणाले, वडगाव मावळ येथील सातेगाव येथे शैक्षणिक संकुल उभारले आहे. त्याला ‘पिंपरी-चिंचवड विद्यापीठ, पुणे’ अशा स्वतंत्र विद्यापीठास राज्य सरकारने मान्यता दिली. जून 2023 पासून हे विद्यापीठ कार्यरत होईल. पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट 32 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. सगळ्या इन्स्टिट्यूट NBA मान्यता आहेत. देश, विदेश, महाराष्ट्राच्या विविध भागांतील मुले आमच्या महाविद्यालयात शिकायला येतात. विद्यापीठात कला, विज्ञान, अभियंता, फार्मसी, कायद्याचे शिक्षण सुरू करण्याचा आमचा मनोदय आहे. 24 पेक्षाही जास्त आंतरराष्ट्रीय विद्यापीठासोबत आमचा करार आहे. दर्जेदार शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने आमच्या प्रस्तावाला मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.