PCMC : पटसंख्येनुसार शाळांना निधी; डीबीटी योजनेंतर्गत पालकांच्या खात्यात पैसे होणार जमा

आयुक्त शेखर सिंह यांची माहिती

एमपीसी न्यूज – महापालिका शाळांमध्ये (PCMC) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महापालिका विविध महत्वाकांक्षी उपक्रम राबवित असते. याच अनुषंगाने महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या खात्यात यावर्षीही डीबीटी योजनेंतर्गत पैसे जमा केले जाणार आहेत. मागील वर्षीपेक्षा प्रभावी पद्धतीने ही योजना राबविण्यासाठी आणि पालकांनी आपल्या पाल्यासाठी घेतलेल्या शालेय वस्तुंची खातरजमा करण्यासाठी या योजनेतील त्रुटी दूर करण्यावर महापालिका भर देणार आहे. तसेच महापालिका शाळांमधील समस्या शालेय स्तरावरच सोडविण्यासाठी मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीला शाळेतील पटसंख्येनुसार निधी देण्याचा महापालिकेचा मानस आहे, जेणेकरून जलद पद्धतीने महापालिका शाळांमधील समस्या सोडविण्यास मदत मिळणार आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने ‘बालकांची सुरक्षितता’ या विषयावर आकुर्डी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहामध्ये विशेष मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना आयुक्त शेखर सिंह बोलत होते.

यावेळी प्रदीप जांभळे पाटील, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस निरीक्षक माधुरी पोकळे, पर्यावरण शिक्षण केंद्राचे वरिष्ठ कार्यक्रम समन्वयक अमरनाथ करण, आकांशा फाऊंडेशनच्या जयश्री ओबेरॉय, मुस्कान फाउंडेशनच्या संचालक शुभदा रणदिवे तसेच प्राथमिक, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, शाळा व्यवस्थापन समितीमधील सदस्यांचा सहभाग वाढविण्यावर तसेच त्यांनी दिलेल्या सुचनांच्या आधारे शाळांचा दर्जा तसेच मुलांची पटसंख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या प्रमुखांनी आणि पालकांनी शाळेमध्ये चाललेल्या कारभाराबद्दल विचारपूस करणे गरजेचे आहे. महापालिका शाळांनी पटसंख्या वाढविण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना किंवा पालकांना येत असलेल्या अडचणींबद्दल विचारपूस करणे तसेच त्या अडचणींवर तोडगा काढणे गरजेचे आहे. पालकांनीही आपल्या पाल्याला शाळेत पाठविणे गरजेचे आहे. जोपर्यंत तुमचा पाल्य शाळेत येणार नाही तोपर्यंत महापालिका विद्यार्थ्यांसाठी करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळणार नाही.

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणाले, जल्लोष शिक्षणाचा पर्व -2 कार्यक्रमास मुलांचा आणि शाळांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. पुर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारचा भव्य कार्यक्रम राबविणारी कदाचित पिंपरी चिंचवड (PCMC) महानगरपालिका एकमेव पालिका आहे. यापुढेही हा उपक्रम आणखी प्रकारे राबविण्याचा महापालिकेचा मानस आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने महापालिका विविध उपक्रम राबवित असते. 32 महापालिका शाळांमध्ये क्रिडा शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे जेणेकरून अभ्यासासोबत विद्यार्थ्यांच्या शारिरिक विकासालाही चालना मिळावी.

शिक्षकांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी डेटा ऑपरेटर्सची नियुक्तीही करण्यात आली आहे. तसेच सारथी हेल्पलाईनद्वारे महापालिका शाळांच्या तक्रारी जलद पद्धतीने सोडविण्यास मदत होत आहे. यासोबतच 50 प्राथमिक शाळांमध्ये वर्ग ग्रंथालयांची निर्मिती करण्यात आली आहे जेथे विविध पुस्तकांचा संग्रह उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, शाळांमध्ये वॉटर फिल्टर तसेच इतर शालेय साहित्यांची सोय आणि भौतिक सुविधांवर भर देण्यावर महापालिका लक्ष केंद्रित करत आहे.

पर्यावरण शिक्षण केंद्राचे वरिष्ठ कार्यक्रम समन्वयक अमरनाथ करण यांनी लहान मुले तसेच तरुणांसाठी रस्ते सुरक्षा कृती योजना या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, रस्ते अपघातांमुळे मृत्यु होण्याचे प्रमाण लहान मुले किंवा तरुणांमध्ये वाढत आहे. महाराष्ट्रातही या अपघातांचे प्रमाण जास्त आहे. बऱ्याच वेळा लहान मुले शाळेत जात असताना त्यांचेही अपघात झाल्याचे निदर्शनास आले आहे. या अपघातांमध्ये बऱ्याच लहान मुलांचे शैक्षणिक नुकसान होते किंवा त्यांना शारिरिक अपंगत्वाला सामेरे जाऊ लागू शकते. या भितीपोटी प्रत्येक पाल्याने प्रायवेट व्हेईकलने शाळेत जावे अशी अनेक पालकांची इच्छा असते, पण हे समस्येचे समाधान नाही.

यामुळे पायी शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना आणखी धोका निर्माण होऊ शकतो. जागतिक पातळीवर या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. शहरी पातळीवर या समस्येला तोंड देण्यासाठी पायी किंवा सायकलवर शाळेत जाणे आणि सार्वजनिक वाहतुकीस प्रोत्साहन देणे आणि रस्त्यांमध्ये सुधारणा करणे या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

Pune : भटक्या विमुक्त जमातीच्या मतदार नोंदणीबाबत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून आढावा

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून महिलांसाठी आणि (PCMC) लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत पोलीस निरीक्षक माधुरी पोकळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी त्या म्हणाल्या, लहान मुलांच्या समस्या सोडविण्यासाठी पोलीस काका/दीदी किंवा पोलीस मित्र या संघटनांची स्थापना करण्यात आली आहे.

तसेच बऱ्याच वेळा लहान मुले त्यांना आलेल्या समस्या किंवा अडचणी आई-वडिलांच्या भितीने घरी सांगत नाहीत. त्यांचे समुपदेशन करण्यासाठी पोलीस स्थानकाच्या शेजारी एका स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षामध्ये लहान मुलांचे समुपदेशन केले जाते जिथे त्यांना आलेल्या समस्या किंवा अडचणींवर उपाय शोधले जातात. पालकांनीही याबाबत सजग राहून पाल्याची वेळोवेळी विचारपूस केली पाहिजे. मुलांच्या वागणुकीत बदल जाणवला किंवा त्यांना काही अडचणी असतील तर त्यांना प्रेमाने विश्वासात घेऊन विचारपूस केली पाहिजे.

मुस्कान फाउंडेशनच्या संचालक शुभदा रणदिवे यांनी लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारापासून मुलांना सुरक्षित ठेवण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, लहान मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्यास याची माहिती त्वरित पोलिसांना देणे गरजेचे आहे. आजच्या सोशल मिडीयाच्या काळात व्हिडीओ, फोटो, चॅटिंगद्वारे ब्लॅकमेलिंगचे प्रमाण वाढले आहे.

याबाबत मुलांना अवगत करून देणे हे प्रत्येक पालकांचे आणि शिक्षकांचे कर्तव्य आहे. शाळांमध्ये गुड टच आणि बॅड टच बाबत मुलांना सविस्तर माहिती देणेही गरजेचे आहे. बऱ्याचवेळा लहान मुले या गोष्टी घरच्यांना सांगण्यास घाबरतात किंवा घरचे त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत. पालकांनीही आपल्या पाल्याला विश्वासात घेऊन कोणतीही भिती न बाळगता त्याच्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात पोलिसांत तक्रार देणे गरजेचे आहे.

या मेळाव्यात मुस्कान फाऊंडेशनच्या वतीने ‘लैंगिक शोषण’ या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांनी केले तर उपस्थितांचे आभार अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.