PCMC : अधिका-यांकडून मिरवणूक मार्ग दुरुस्ती, विसर्जन घाटांची पाहणी

एमपीसी न्यूज – गणेशोत्सवाच्या (PCMC) स्वागतासाठी महापालिका यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे. या काळात कोणतीही उणीव राहू नये यासाठी मिरवणूक मार्ग दुरुस्ती, विसर्जन घाट साफसफाई अशा प्रमुख बाबींवर लक्ष केंद्रित करून महापालिका प्रशासन क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली कामाचे नियोजन आणि पूर्तता केली जात आहे. संबंधित क्षेत्रीय अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रातील विसर्जन घाटांवर प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी करून कामाचा आढावा घेत आहेत.

आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच बैठक संपन्न झाली. त्यामध्ये त्यांनी गणेशोत्सवाबाबत माहिती घेऊन महापालिका प्रशासनाला विविध निर्देश आहेत. पोलीस प्रशासनासोबत बैठक घेऊन समन्वयाने कामकाज करण्याची सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिका अधिका-यांना दिल्या. विविध पर्यावरण प्रेमी स्वयंसेवी संस्थाच्या प्रतिनिधींसमवेत संवादात्मक बैठक घेऊन यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक कसा करता येईल यावर भर दिला जात आहे.

पिंपरी चिंचवड शहरात साजरा होणा-या यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने क्षेत्रीय स्तरावर नियोजन सुरु आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार विसर्जन घाटांवर असलेल्या कृत्रिम हौदांची तसेच आजूबाजूच्या परिसराची अधिक मनुष्यबळाचा वापर करून साफसफाई करण्यात येत आहे. विसर्जन ठिकाणांची पाहणी करून तेथे आवश्यक असणा-या सुविधांच्या उपलब्धतेबाबत संबंधित विभागांना सूचना दिल्या जात आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन घाटांवर सीसीटीव्ही यंत्रणेसह विद्युत व्यवस्था देखील करण्यात येत आहे.

Hadapsar Police : दारुच्या गोडाऊनमध्ये चोरी करणारे तिघे अटकेत, 49 लाखांचा मुद्देमाल जप्त

आज सांगवी भागातील विसर्जन घाटांवर क्षेत्रीय अधिकारी (PCMC) विजयकुमार थोरात यांच्यासह उपआयुक्त रविकिरण घोडके, विशेष अधिकारी किरण गायकवाड, स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल शिंदे, दिलीप धुमाळ, सहायक आरोग्य अधिकारी बी. सी. कांबळे, जनता संपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह स्थापत्य, विद्युत आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने प्रत्यक्ष भेट देऊन त्या ठिकाणी सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. तसेच आवश्यक सुविधांबाबत संबधित अधिकाऱ्यांना विविध सूचना देखील दिल्या.

शहरात यावर्षी गणेशोत्सव काळात मोठ्या संख्येने गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होण्याची शक्यता विचारात घेऊन महापालिका क्षेत्रीय स्तरावर पर्यावरणप्रेमी स्वयंसेवी संस्था व गणेश मंडळे यांच्याशी समन्वय ठेवून शहरात विविध ठिकाणी घरगुती मूर्ती विसर्जन करण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. शिवाय विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन हौद, मूर्ती संकलन केंद्र तसेच निर्माल्य संकलन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गणेशोत्सव कालावधीत आपत्ती व्यवस्थापनाबाबत तसेच सुरक्षा व्यवस्था ठेवणेबाबत संबंधित विभागाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत असून महत्वाच्या ठिकाणी कंट्रोल रूमची उभारणी करून त्याद्वारे सर्व घडामोडींवर लक्ष ठेवले जाणार आहे. विसर्जन घाटावर पुरेशा प्रमाणात कर्मचारी नेमण्यात येणार असून तेथे जीवरक्षकांची देखील नेमणूक केली जाणार आहे. तसेच बोटींसह आवश्यक सर्व यंत्रणा तैनात ठेऊन कोठेही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेतली जाणार आहे. या काळात शहरातील पाणीपुरवठा पुरेसा व सुरळीत राहील (PCMC) याबाबत महापालिका प्रशासन दक्षता घेणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.