Pimpri News : अन्याय होणा-या व्यक्तींना जागृत केले पाहिजे – डॉ. वृषाली रणधीर

एमपीसी न्यूज – अन्यायकारी आणि विषमतेवर आधारित असलेल्या व्यवस्थेला बदलून टाकण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या क्रांतीसंघर्षातून आजही अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा मिळते. अन्याय होणा-या व्यक्तींना जागृत करण्याचे काम केले पाहिजे, समतेचा विचार पुढे नेला पाहिजे. लोकशाहीचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी विज्ञानाची कास धरत मानवतावादी दृष्टीकोन जोपासला पाहिजे, असे मत पुणे येथील वाडिया महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वृषाली रणधीर यांनी व्यक्त केले.

महापालिकेच्या पिंपरी येथील नवीन जिजामाता रुग्णालयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त वाडिया महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रणधीर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमास अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता साळवे, डॉ. अल्वी नासेर, डॉ. वैशाली भामरे, डॉ. करुणा साबळे, डॉ. प्रफुल्ल तपशाळकर, डॉ. स्नेहा जगदाळे, डॉ. वैशाली सावळे, डॉ. क्षीरसागर यांच्यासह वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.

जागरूकपणे प्रत्येक ठिकाणी पाऊल ठेवल्यास आपण प्रतिकूल परिस्थिती बदलू शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर होय, असे नमूद करून डॉ. वृषाली रणधीर म्हणाल्या, धर्म संस्कृतीतील जातीय विषमता आणि अनिष्ट रूढी परंपरेमुळे स्त्रीयांसह उपेक्षितांचे प्रचंड शोषण झाले. त्यांना माणूस म्हणून वागवले गेले नाही. हजारो वर्ष गुलामीचे जीवन त्यांच्या वाट्याला आले. महिलांना उपभोगाची वस्तू समजण्यात आले, शिवाय अनेक बंधनात देखील अडकवण्यात आले.

व्यवस्थेने गुलाम ठरवलेल्या या लोकांना बाबासाहेबांनी गुलामीची जाणीव करून दिली. बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले यांना गुरु मानून बाबासाहेबांनी समतेचा लढा लढला. भारतीय संविधानाच्या माध्यमातून उपेक्षित समाजाला न्याय मिळवून दिला. त्यामुळेच महिला आणि उपेक्षितांना आज सन्मानाचे स्थान प्राप्त झाले असून ते स्वाभिमानी जीवन जगत आहेत, असे डॉ. रणधीर म्हणाल्या.

डॉ. पवन साळवे म्हणाले, डॉ. बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून दिलेल्या हक्क अधिकारामुळे वंचित घटक मुख्य प्रवाहात येत असून यामध्ये स्त्रीयांचे प्रमाण अधिक आहे. महापुरुषांच्या प्रेरणेमुळे स्त्री शक्तीमध्ये प्रचंड ताकद निर्माण झाली असून अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी त्यांनी सामुहिक लढा दिला पाहिजे.

यावेळी डॉ.गोफणे, डॉ.डांगे, किरण गायकवाड यांनीही समयोचित भाषणे केली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार असलेले फलक हातात घेऊन रुग्णालयीन कर्मचा-यांनी संगीत कार्यक्रम सादर केला. जयश्री शिरसाठ यांनी भीमगीते सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर गवळी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.