Bhosari : चिमुकल्याची पिगी बँक धावली पूरग्रस्तांच्या मदतीला

एमपीसी न्यूज – सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात मोठे पूर संकट आले. यामध्ये नागरिकांसह जनावरांचा देखील बळी गेला. या भीषण संकटामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. राज्यभरातून दोन्ही जिल्ह्यात मदतीचा ओघ सुरु झाला. त्यातच भोसरीतल्या पाच वर्षाच्या चिमुकल्याने सुद्धा भर घातली. त्याने खाऊसाठी साठवलेली पिगी बँक पुरग्रस्तांच्या मदतीला दिली. त्याचबरोबर लहान बहिणीबरोबर मिळून किराणा सामान सुद्धा खरेदी करून दिले. एवढ्या लहान वयात चिमुकल्याने दाखवलेली ही सहृदयता अवघ्या मानवजातीला प्रेरणा देणारी आहे.

मागील आठवड्यात सांगली, कोल्हापूर जिल्हा आणि परिसरात पूर आला. पुरात अनेक गावे बुडाली, हजारो संसार उघड्यावर आले. लाखो लोक रस्त्यावर आले. पिण्याच्या पाण्यापासून जेवणापर्यंत आणि जनावरांच्या वैरणीपासून निवा-यापर्यंत सर्वच गोष्टींना अडचणी येऊ लागल्या. यात कित्येक लोकांचा मृत्यू झाला. दावणीला बांधलेली जनावरे दावणीलाच मरण पावली. निसर्गाच्या रौद्र रुपामुळे अवघा महाराष्ट्र हळहळला. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून मदतीचा ओघ सुरु झाला. ज्याला जमेल त्या पद्धतीने मदत करू लागला. हजारो ट्रक मदत घेऊन सांगली, कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले.

सक्षम सुनील लांडे वय वर्ष केवळ पाच. भोसरी मधील गव्हाणे वस्तीत आई, वडील, लहान बहीण आणि सक्षम असा चार जणांचा सुखी परिवार आहे. वडील कबड्डी खेळाडू आहेत. पुराच्या दिवसरात्र टीव्ही, वर्तमानपत्रात येणा-या बातम्या. सोशल मीडियावर येणारे व्हिडिओ, फोटो, पूरग्रस्तांना केली जाणारी मदत याविषयी सक्षमच्या आई-वडिलांनी त्याला दाखवले. तेंव्हापासून त्याच्या डोक्यात काहीतरी सुरु होते. पण तो खेळामध्ये किंवा त्याच्या कामामध्ये रमला असे समजून त्याच्या आई-वडिलांनी त्याच्याकडे लक्ष दिले नाही.

सक्षमने त्याला खाऊसाठी दिलेले पैसे साठवून त्याची एक पिगी बँक तयार केली होती. मागील दोन दिवसांपूर्वी त्याने लहान बहीण स्वानंदी सोबत मिळून घराजवळच्या किराणा दुकानातून किराणा बाजार खरेदी केला. त्यामध्ये दोन किलो तेल, एक किलो साखर, एक किलो मसूर डाळ, एक किलो तूर डाळ, पाच किलो गहू असे एकएक करून खरेदी केले. दोन दिवस त्याने एक एक करून किराणा बाजार घरात गुपचूप आणून कपड्याखाली झाकून ठेवला. दोघा भावंडांनी मिळून त्यांची न लागणारी कपडे जमा केली.

सक्षमने दोन दिवसात संपूर्ण तयारी केली. पण ही मदत द्यायची कुठे हे माहिती नसल्यामुळे त्याने रविवारी सकाळी अचानक त्याच्या मामांना पूरग्रस्तांना मदत करण्याबाबत सांगितले. त्याने केलेली तयारी सांगितली. हे ऐकून त्याच्या घरच्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यासोबतच आपला भाचा एवढा चांगला विचार करत असल्याबाबत त्यांना अभिमान देखील वाटला. त्याची ही कल्पकता पाहून घरच्यांच्या डोळ्यात पाणी तरळले.

भोसरी येथे आमदार महेश लांडगे यांच्या संपर्क कार्यालयात मदतनिधी आणि वस्तु स्वीकारल्या जात आहेत. त्यामध्ये आपलीही मदत करण्यासाठी सक्षम, त्याचे मामा आणि लहान बहीण असे तिघेजण गेले. एवढ्या लहान वयात गरजूंना मदत करण्याची जाणीव होणं ही खरोखर खूप मोठी बाब आहे. त्यामुळे आमदार लांडगे यांनी सक्षमला जवळ बोलावून त्याची विचारपूस केली. त्यावेळी त्याने त्याची सोबत आणलेली पिगी बँक आमदार महेश लांडगे यांच्याकडे दिली. आमदार लांडगे यांनी पिगी बँकेची रक्कम मोजली. ती रक्कम जवळपास 800 रुपये होती.

घरच्यांनी खाऊसाठी दिलेले एक-दोन रुपये साठवून त्याने ही बँक साठवली होती. त्याची स्वतःची सगळी स्वप्ने बाजूला ठेऊन त्याने अचानक पिगी बँक आमदारांना दिल्याने घरच्यांना पुन्हा धक्का बसला. कारण या पिगी बँकेबाबत त्याने घरी एक शब्द देखील काढला नव्हता. उजव्या हाताने केलेली मदत डाव्या हाताला देखील कळू देऊ नये, या म्हणीचा अर्थ सक्षमने सार्थ करून दाखवला. एवढ्या लहान वयात एवढं शहाणपण बघून आमदार महेश लांडगे देखील चकित झाले. ही मानवीयता अशीच वृद्धिंगत व्हायला हवी. या माणुसकीसाठी ‘सक्षम’ ख-या अर्थाने सक्षम बनला आहे. त्याच्या एखाद्या किलो साखर, डाळीने पूरग्रस्तांना फार मोठा फरक नाही पडणार. पण मदतीची ही भावना खूपच मोठी आहे. थेंबाथेंबातून तळे साचण्याची प्रकिया होणार आहे. यातूनच उद्याचा ‘सक्षम’ भारत निर्माण होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like