Pimple Soudagar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले रोजलँड रेसिडेन्सी सोसायटीमधील रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाचे कौतुक

एमपीसी न्यूज – पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब वाचवून पाणीटंचाई वर मात करणे ही आता काळाची गरज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपळे सौदागर येथील रोजलँड रेसिडेन्सी सोसायटीने आपल्या आवारात रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारला. या प्रकल्पाची माहिती ट्विटरवर शेअर केल्यानंतर पंतप्रधानांनी त्याची दखल घेत सोसायटीने केलेल्या कामाचे कौतुक केले. रोजलँड सोसायटीने केलेल्या या प्रकल्पाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे तितकेच महत्वाचे आहे.

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी अलीकडेच आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात रेन वॉटर हार्वेस्टिंग संदर्भात केलेल्या कामांची माहिती #janshakti4jalshakti या हॅशटॅग द्वारे शेअर करण्याचे आवाहन देशवासियांना केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपळेसौदागर येथील रोजलँड रेसिडेन्सी हौसिंग सोसायटीने आपल्या आवारात केलेल्या रेन हार्वेस्टिंग प्रकल्पाची माहिती ट्विटर वर शेअर केली होती. या माहितीची दाखल घेत पंतप्रधानांनी Keep up the good work! असे ट्विट करीत सोसायटी करीत असलेल्या कामाचे कौतुक केले.

हा रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प आहे तरी काय? या प्रकल्पामुळे सोसायटीमधील पाण्याचा प्रश्न मिटला का ? या प्रकल्पासाठी किती खर्च आला ? हे जाणून घेणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. जेणेकरून इतरांनी त्याचा आदर्श घेऊन असा प्रकल्प आपल्या सोसायटीमध्ये राबवून पाण्याची समस्या मिटवून टाकावी. सोसायटीचे अध्यक्ष संतोष मस्कर यांनी याबाबत एमपीसी न्यूजच्या प्रतिनिधी बरोबर बातचीत केली.

2007 मध्ये स्थापन झालेल्या रोजलँड रेसिडेन्सी सोसायटीमध्ये एकूण 982 फ्लॅट असून सोसायटीमधील सुमारे साडेतीन हजार रहिवासी वास्तव्य करतात. या रहिवाशांपुढे पाण्याची समस्या उद्भवू नये यासाठी 19 बोअरवेल खोदण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे भविष्यातील पाण्याची गरज ओळखून येथील रहिवाशांनी पाणी वाचवण्यासाठी वेगवेगळ्या उपायांचा देखील अवलंब केला आणि पाणी काटकसरीने वापरण्याचे धोरण अवलंबले. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे पाण्याची समस्या या सोसायटीला कधीच भासली नाही. त्याचबरोबर सोसायटीच्या प्रत्येक इमारतीच्या गच्चीवरील पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाच्या माध्यमातून जमिनीत मुरवण्याचे काम केले.

उन्हाळ्यात देखील टँकरने पाणी आणण्याची वेळ सोसायटीच्या रहिवाशांवर आली नाही. परंतु, या भागामध्ये होत असलेल्या बांधकामामुळे मागील एक दोन वर्षांपासून सोसायटीच्या बोअरचे पाणी कमी होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे सोसायटीला पाण्याची समस्या भेडसावू लागली.

त्या समस्येवर मात करण्यासाठी यंदा पुन्हा सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली. यावेळी त्यांनी सोसायटीच्या आवारात जमिनीवर पडणारे पाणी देखील वाचवण्याचा निश्चय केला. सर्व तांत्रिक माहिती घेऊन सोसायटीच्या आवारात 20 बाय 10 मीटर क्षेत्रफळाच्या जागेत 14 फूट खोल खड्डा घेऊन शास्त्रोक्त पद्धतीने त्यामध्ये पाईपद्वारे जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी सोडण्याची व्यवस्था केली.

त्याचा परिणाम त्यांना या पावसाळ्यामध्येच दिसून आला. शहरात पडलेल्या दोन पावसानीच सोसायटीमध्ये बंद अवस्थेत असलेल्या दोन बोअरवेलना पुन्हा पाणी सुरू झाले. एक वर्षांपासून जेंव्हा पाण्याची टंचाई भासू लागली त्यावेळी टँकर मागवून पाण्याची गरज भासवण्याऐवजी दिवसातून फक्त 2 तास पाणी देण्याचे धोरण अवलंबले. त्याला सोसायटीमधील सर्व रहिवाशांनी साथ दिली. पण आता 24×7 पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र असे असून देखील रहिवासी पाण्याचा जपूनच वापर करीत आहेत हे महत्वाचे !

याबाबत बोलताना सोसायटीचे अध्यक्ष संतोष मस्कर म्हणाले, “प्रत्येक सोसायटीमधून असा प्रकल्प होण्याची गरज आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवल्यास आपल्याला कधीच पाण्याची कमतरता भासणार नाही. आत्ता केलेल्या प्रकल्पाला आम्हाला फक्त 45 हजार रुपये खर्च आला. माननीय पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आम्ही आमच्या कामाबद्दलचे ट्विट करून पंतप्रधानांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी देखील आमच्या कामाचे कौतुक करून Keep up the good work! असे ट्विट केले आहे. त्याशिवाय पानीफाऊंडेशन कडून देखील आमच्या कामाची दखल घेतली गेली आहे” आम्हाला जे जमले ते शहरातील अन्य सोसायटीने का जमू नये ? असा प्रश्न त्यांनी शहरवासीयांना उद्देशून केला.

भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता प्रत्येक सोसायटीने तसेच शासकीय इमारतीमधून असा प्रकल्प राबवल्यास जमिनीतील पाण्याची पातळी वाढून शहरवासीयांसमोरील पाणी टंचाईचे संकट दूर करण्याची खरी गरज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.