Pimpri: सत्ताधा-यांना अर्थसंकल्पाचे; महासभेचे गांभीर्य नाही – मंगला कदम

'खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी'; सत्ताधा-यांचे धोरण असल्याचा आरोप; स्वपक्षियांनी दिलेल्या घरच्या आहेराचे आत्मपरिक्षण करण्याचा दिला सल्ला

एमपीसी न्यूज – सत्ताधारी भाजपला अर्थसंकल्पाचे, महासभेचे कोणतेही गांभीर्य नाही. अर्थसंकल्पाला अगोदर मंजुरी दिली जाते. त्यानंतर त्यावर चर्चा केली जाते. त्या चर्चेला कोणतेही महत्व नसून याने महासभेचे गांभीर्य घालविले जात आहे. बेकायदेशीपरणे सभा कामकाज चालविले जाते, असा आरोप माजी महापौर, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेविका मंगला कदम यांनी केला. तसेच शहरात सर्वत्र कच-याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गाड्या उपलब्ध नसल्याचे सांगत 15 दिवस थांबा असे सांगितले जाते. हे उत्तर म्हणजे ‘खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी’ असे धोरण आहे. स्वपक्षीय नगरसेवकांनी दिलेल्या घरच्या आहेराचे आत्मपरिक्षण करावे, असा सल्लाही त्यांनी सत्ताधा-यांना दिला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची अर्थसंकल्पाची मंजुरीसाठी आज (शनिवारी) आयोजित केलेली विशेष महासभा संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मंगला कदम म्हणाल्या, अर्थसंकल्पाला तातडीने मंजुरी देण्याची आवश्यकता नव्हती. आम्हाला त्याची चिरफाड करु दिली नाही. महापौर नवीन नाहीत. मंजुरी दिल्यानंतर त्यावर होणा-या चर्चेला कोणताही अर्थ नसतो. भाजपने पहिल्यावर्षी देखील अशाच पद्धतीने अर्थसंकल्प मंजुर केला होता. त्यानंतर चर्चेचा आग्रह धरला होता.

  • आचारसंहिता असल्याने आयुक्तांनी अर्थसंकल्पाची अंमलबजावणी सुरु केली आहे. त्यामुळे त्यावर चर्चा केली जाणार नव्हती. तर, मागच्या सर्वसाधरण सभेत त्याला मंजुरी घ्यायला पाहिजे होती. त्यासाठी विशेष सभा घेण्याची आवश्यकता नव्हती. अगोदर मंजुरी देऊन पुन्हा बोलण्यास संधी दिली जाते. हे अंत्यत चुकीचे आहे. विषय संपल्यानंतर बोलल्याले इतिवृत्तामध्ये घेतले जाणार आहे का? बेकायदेशीरपणे सभा कामकाज चालवून सत्ताधारी महासभेचे महत्व कमी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सत्तेला अडीच वर्ष पूर्ण होत आली. तरी आम्ही काय केले हे विचारतात. हे किती वर्ष बोलावे, असे बोलणे म्हणजेच स्व:ताला सभागृह चालविता येत नसल्याची कबुली देत आहेत. स्वपक्षीय नगरसेवकच घरचा आहेर देत आहेत. स्वत:च्या पक्षाच्या नगरसेवकांनी वेशीवर टांगलेल्या अब्रुचे सत्ताधा-यांनी आत्मपरिक्षण करावे असा सल्लाही कदम यांनी दिला.

  • शहरात सर्वत्र कच-याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. जागोजागी कच-याचे ढीग साचले आहेत. दैनंदिनपणे कचरा उचलला जात नाही. रस्त्यांची साफसफाई केली जात नाही. याबाबत विचारले असता 15 दिवस थांबा, नवीन गाड्या येणार आहेत. त्यानंतर नवीन कंत्राटदार काम सुरु करेल, अशी उत्तरे दिली जातात. हे म्हणजे ‘खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी’ असे धोरण असल्याचेही त्या म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.