Pimpri News : महापालिकेचा आता व्यावसायिक कबड्डी संघ; महासभेची मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून शहरातील कबड्डीपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी व्यावसायिक कबड्डी संघाची घोषणा करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.

भाजपा नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी गेल्या दीड वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेचा व्यावसायिक कबड्डी संघ असावा यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. पिंपरी-चिंचवड शहरातील स्थानिक गुणवंत कबड्डीपटूंना पुणे, मुंबईसह परराज्यातील कंपन्यांकडे नोकरीसाठी व्यावसायिक संघात स्थान मिळवावे लागत आहे.

त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक खेळाडुंना संधी मिळण्यासाठी व्यावसायिक संघ तयार करावा, असा प्रस्ताव ठेवला होता. क्रीडा समिती सभापती प्रा. उत्तम केंदळे यांनी या प्रस्तावावर सूचक म्हणून, तर नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली आहे.

नगरसेविक कुंदन गायकवाड म्हणाले की, शहरातील गुणवंत कबड्डीपटूंना खासगी कंपन्या किंवा अन्य व्यावसायिक संघांमध्ये स्थान मिळवण्यासाठी झगडावे लागत होते. तसेच, राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करणारे शहरातील खेळाडू अन्य शहर किंवा कंपनीच्या नावाने खेळत होते. यापुढील काळात शहरातील खेळाडू पिंपरी-चिंचवडसाठी खेळतील. प्रत्येक पिंपरी-चिंचवडकराला त्याचा अभिमान वाटेल. शहरातील कबड्डी क्षेत्राला प्रोत्साहन आणि नवोदितांना संधी निर्माण होणार आहेत.

‘सर्वोत्कृष्ट क्रीडा पुरस्कार’ची घोषणा’

महापालिका सर्वसाधार सभेत मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार, आगामी काळात पिंपरी-चिंचवड महापालिका ‘सर्वोत्कृष्ट क्रीडा पुरस्कार’ची घोषणा करणार आहे. त्याअंतर्गत क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे प्रतिभावान खेळाडू, दिव्यांग खेळाडू आणि मार्गदर्शकांना गौरविण्यात येणार आहे.

तसेच, आंतरराष्ट्रीय खेळाडू पुरस्कार धोरणही तयार करण्यात येणार आहे. महापालिकेच्या अ,ब,क वर्ग व्यायामशाळांबाबतही धोरण तयार करण्यात येईल. विशेष म्हणजे, मुले आणि मुलांसाठी स्वतंत्र व्यावसायिक कबड्डी संघ तयार करण्यात येणार असून, त्याचे धोरण ठरविण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना सोपवण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.