Pimpri News : कोणत्याही पदावर नसलेल्या पार्थ पवारांसोबत आयुक्तांच्या अँटी चेंबरमध्ये बैठका; सत्ताधाऱ्यांचा हल्लाबोल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची नियुक्ती बेकायदेशीरपणे झाली आहे. मावळ लोकसभा मतदार संघातील पार्थ पवार यांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आयुक्त सुपारी घेऊन आले आहेत. पार्थ लोकप्रतिनिधी नाहीत, त्यांच्याकडे कोणतेही पद नाही, असे असताना आयुक्त पार्थ पवारांसोबत आयुक्तांच्या अँटी चेंबरमध्ये बैठका घेतात; मात्र नगरसेवकांना वेळ देत नाहीत, असा हल्लाबोल सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी महासभेत केला. घोडे मैदान जवळ असून पुन्हा भाजपचीच सत्ता येईल असा विश्वासही व्यक्त केला.

महासभेत भाजपचे सागर अंगोळकर यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्यावर हल्ला चढविला. आयुक्त शहरात सत्ताधारी भाजपची जिरविण्यासाठी आले आहेत. भाजपची सुपारी घेऊन आयुक्त या ठिकाणी रुजू झाला आहात. एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याने असे वागणे शोभत नाही. आम्ही आयुक्तांना भेटायला जातो, तेंव्हा त्यांच्याकडे भेटायला वेळ नसतो. पण, ज्या वेळेस पार्थ पवार भेटायला येतात. त्या वेळेस तासनतास अँटीचेम्बर मध्ये गप्पा मारत बसतात.

पार्थ पवारांकडे कोणतेही पद नसताना आयुक्त त्यांना एवढा वेळ देतात. परंतु, लोकप्रतिनिधी असलेल्या आमच्यासोबत भेटायला वेळ नसते. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू बनसोडे यांनी जोरदार हरकत घेतली. आयुक्त फक्त दोन आमदारांसाठी नेमले आहेत का?, पार्थदादांचे नाव घ्यायची काय गरज आहे?, विषय भरकटू देऊ नका, आम्हालाही बोलता येते.

भाजपचे राहुल जाधव यांनीही आयुक्तांवर टीका केली. आयुक्त साहेब रुजू झाल्यापासून आम्ही नगरसेवक आहोत असे आम्हाला वाटतच नाही. कारण तुम्ही आमची सुपारी घेऊनच येथे आला आहात. आम्ही तुम्हाला कोणतीही घरची कामे सांगत नाही. मात्र, आमची कामे होत नाहीत. आयुक्त हेतुपरस्पररित्या कारवाई करतात, अशी टीका त्यांनी केली.

आयुक्त चुकीची कामे करण्यासाठी आयएएस झाले नाहीत; भाजपला घरचा आहेर

भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आयुक्तांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. वाघेरे म्हणाले, आयुक्त सुपारी घेऊन आले नाहीत. आयुक्त खूप चांगले काम करत आहेत. मी भाजपचा नगरसेवक आहे. त्यांच्याकडे विधायक, लोकहिताची कामे घेऊन गेलो की ती नक्की होतात. चुकीची कामे ते करत नाहीत. चुकीची कामे करण्यासाठी ते आयएएस झाले नाहीत. विधायक कामे घेऊन जावा, ते कामे करतात. आपल्याला शहराच्या सर्वांगीण विकास करायचा आहे. त्या दृष्टीने आपण विचार करायला हवा. फक्त एका नेत्याचा विचार करून नाही चालणार असा सल्लाही त्यांनी महापौरांना दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.