Paper Leak Case : तुकाराम सुपेनी ठेवलेली पैशाची बॅग मित्राने केली पोलिसांच्या स्वाधीन

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) गैरव्यवहारात पुणे पोलीसांच्या सायबर पोलीसांनी अटक केल्यानंतर या प्रकरणात आता दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. तुकाराम सुपे यांनी भ्रष्ट मार्गाने कमावलेल्या पैशांपैकी काही पैसे आपल्या मित्रांकडे ठेवले होते. त्यातील एका मित्राने 33 लाख रुपये असलेली एक बॅग पोलिसांच्या स्वाधीन केली. त्यामुळे सुपे यांनी आणखी कुणाकडे पैसे ठेवले असल्यास त्यांनी पोलिसांकडे आणून द्यावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

‘म्हाडा’ पेपर फुटीसंदर्भात पोलीसांनी जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख, त्याचे साथीदार एजंट संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून टीईटीच्या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलीसांनी याप्रकरणी आयुक्त तुकाराम सुपे व अभिषेक सावरीकर यांना अटक केली. पुढच्या तपासात 2018 मध्ये झालेल्या ‘टीईटी’ परीक्षेत देखील गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्यानंतर तत्कालिन आयुक्त सुखदेव डेरे, जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस कंपनीचे तत्कालीन व्यवस्थापक अश्विनकुमार यांना अटक केली.

दरम्यान सायबर पोलिसांनी तुकाराम सुपे यांच्या घरातुन सुरवातीला दीड कोटींची रोकड व दागिने जप्त केले होते. त्यानंतर पुन्हा त्याची मुलगी व जावयाने यांच्याकडून देखील मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली होती. आता आणखी 33 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. दरम्यान, ही रोकड सुपेने त्याच्या एका मित्राकडे ठेवण्यास दिली होती. तीन सुटकेसमध्ये हे पैसे होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.