Pimpri News : पाच वर्षे ठेकेदारीत गुंतलेल्या भाजपकडून पाणी प्रश्न सोडविता आला नसल्याची कबुली – मंगला कदम

माजी महापौर मंगला कदम यांचे एकनाथ पवार यांना सणसणीत प्रत्युत्तर

एमपीसी न्यूज – मागील पाच वर्षे पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तेत असताना भाजप आंद्रा, भामा-आसखेड धरणातून पाणी आणू शकली नाही. भाजप पदाधिकारी केवळ ठेकेदारी, रिंग करणे, पक्षीय राजकारणात दंग होते. त्यांना जनतेचा कळवळा नव्हता. भाजपच्या भ्रष्ट कारभारामुळेच मागील अडीच वर्षांपासून शहरवासीयांना एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. पाणी प्रकल्पाला भाजपला चालना देता आली नाही. सत्ता चालविता आली नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीवर आरोप करुन पाच वर्षात पाणी प्रश्न सोडविण्यात अपयश आल्याची कबुलीच भाजपने दिली असल्याचे माजी महापौर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या मंगला कदम म्हणाल्या.

प्रशासकाने महापालिका ताब्यात घेऊन आठ दिवस उलटत नाहीत तोच संपूर्ण शहरात जाणीवपूर्वक कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आयुक्त राजेश पाटील यांच्यावर दबाव टाकून पाण्यावरून भाजपला बदनाम करण्याचा डाव आखला असल्याचा आरोप भाजपचे माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केला होता.

त्यावर भाजपनेच 2019 पासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला असल्याची आठवण करून देत माजी महापौर मंगला कदम यांनी पवार यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. मागील दोन वर्षात बाराही महिने पाऊस पडत असल्यासारखी परिस्थिती आहे. धरणात मुबलक पाणीसाठा असतानासुद्धा भाजपमुळे नागरिकांची पाण्यासाठी फरफट होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

माजी महापौर कदम म्हणाल्या, ”केंद्रात भाजपची सत्ता आहे. राज्यात, पालिकेत पाच वर्षे तुमची सत्ता होती. तरीही पाण्याचे प्रकल्प मार्गी लागले नाहीत. याला तुमचा भोंगळ, ढिसाळ, नियोजनशून्य कारभार जबाबदार आहे. तुम्ही स्वत: ठेकेदारीत गुंतला होतात. त्यावेळी तुम्हाला जनतेचा पुळका येत नव्हता. शहर मागील आठ दिवसांत वाढले नाही. आम्ही आणलेले प्रकल्प मार्गी लावता आले नाहीत. तुन्ही केवळ ठेकेदारी आणि पक्षीय राजकारणात गुरफटून पडला होतात. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. उठसूठ राष्ट्रवादीच्या नावाने बोंबा मारणे बंद करावे. तुमच्या कारकिर्दीत पाणी प्रकल्पाला चालना देऊ शकला नाहीत. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे थांबवा. प्रशासकावर आमचे नियंत्रण नाही. तुम्ही प्रशासकांकडून प्रश्न मार्गी लावण्याचे सोडून पक्षीय राजकारण करत आहात. तुम्हाला पाच वर्षात प्रश्न सोडविता आला नसल्याने तुम्ही राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा केविलावणा प्रयत्न करत असून त्यातून तुम्ही अपयशाची कबुली देत आहात”.

”भाजपने पवना बंदिस्त जलवाहिनीचे केवळ राजकारण केले. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना शहरवासीयांना कधीच पाणीपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागले नाही. वाढते शहर लक्षात घेऊन राष्ट्रवादीने पाण्याचे प्रकल्प मार्गी लावले. आंद्रा, भामा-आसखेड शहरासाठी पाणी आरक्षणाचा कोटा मंजूर केला. पण, मागील पाच वर्षात भाजपला तो प्रकल्प मार्गी लावता आला नाही. भाजपच्या जवळच्या लोकांना काम मिळण्यासाठी रिंग करण्यात भाजप पदाधिकारी दंग होते. त्यामुळेच प्रकल्प मार्गी लागला नाही. त्याउलट पुणे महापालिकेने बंद पाइपलाईनद्वारे पुणेकरांना पाणी दिले. पण, पिंपरीतील भाजपचे पदाधिकारी पाणी आणू शकले नाहीत”, असे कदम म्हणाल्या.

”मोदी लाटेच्या जोरावर महापालिकेत पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या भाजपने मागील पाच वर्षे भ्रष्टाचाराशिवाय दुसरे काहीच केले नाही. धरणे फुल भरली असताना भाजपचे पदाधिकारी दररोज पाणीपुरवठा करू शकले नाहीत. भाजपच्या भ्रष्ट कारभारामुळे पिंपरी-चिंचवडकरांना मागील अडीच वर्षापासून दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. पाच वर्षे सत्ता भोगल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करून आपल्या चुकीचे खापर आमच्यावर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न करु नये. शहरातील जनता एवढी दुधखुळी नाही. पाच वर्षे सत्तेत कोण होते, हे जनतेला माहिती आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत शहरातील जनता भाजपला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही”, असा विश्वासही कदम यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.