Pimpri : शॉर्ट सर्किटमुळे कार जळाल्याची दहा दिवसातली तिसरी घटना (UPDATE)

एमपीसी न्यूज – शॉर्ट सर्किट होऊन कारला आग लागण्याची तिसरी घटना पिंपरी येथे बुधवारी (दि. 1) घडली. यापूर्वी 22 डिसेंबर रोजी काळेवाडी तर 26 डिसेंबर रोजी वाकड येथे अशाच प्रकारे चालू कारला शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. आग लागलेल्या सर्व कार प्रवासी वाहतूक करणा-या होत्या.

बुधवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास सतीश तुकाराम बळवाने हे त्यांची स्विफ्ट कार (एम एच 14 / ए आर 6153) घेऊन कासारवाडीकडून निगडीच्या दिशेने जात होते. कार पिंपरी येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एच ए) कंपनीसमोर आली असता कारच्या इंजिनमध्ये शॉर्ट सर्किट झाले. त्यामुळे चालू कारला आग लागली. प्रसंगावधान राखत सतीश कारमधून बाहेर पडले. त्यामुळे त्यांना इजा झाली नाही. मात्र या घटनेत कार पूर्णतः जळून खाक झाली. अग्निशमन विभागाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले.

26 डिसेंबर रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास आमिर तांबोळी त्यांची एम एच 12 / एन बी 1150 ही कार घेऊन जात होते. तातवडे येथून औंधच्या दिशेने जात असताना डांगे चौकाजवळ रघुनंदन मंगल कार्यालयासमोर आल्यानंतर तांबोळी यांच्या कारमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली आणि गाडीने पेट घेतला. प्रसंगावधान राखत चालक आमिर तांबोळी आणि प्रवासी तात्काळ कारमधून बाहेर पडले. रहाटणी अग्निशमन उपविभागाच्या जवानांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

22 डिसेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास काळेवाडी कडून पिंपरीच्या दिशेने येत असलेल्या कारने अचानक पेट घेतला. या कारमध्ये देखील शॉर्ट सर्किट झाल्याची प्राथमिक माहिती त्यावेळी संबंधितांनी दिली होती. या घटनेतही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, तिन्ही घटनांमध्ये कार पूर्णतः जळून खाक झाल्या आहेत. रहाटणी अग्निशमन उपविभागाच्या जवानांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.