Pimpri: अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या स्वागताला ना अधिकारी, ना पदाधिकारी!

भाजपचा असाही राजशिष्टाचार 

एमपीसी न्यूज – राज्याचे अर्थमंत्री तथा भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार आज (गुरुवारी)पिंपरी-चिंचवड शहरात असूनही त्यांच्या मागे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा गराडा पडला ना, महापालिकेच्या अधिका-यांची फौज स्वागताला हजर होती. पुष्प प्रदर्शनाला येवूनही त्यांना ‘कोमजले’ल्या चेह-याने परत जावे लागले. दरम्यान, भाजपचे एक राज्यसभा खासदार, दोन आमदार, दोन महामंडाळाचे अध्यक्ष आणि 80 नगरसेवकांपैकी एकही त्यांच्याकडे फिरकला नाही. त्यामुळे मुनगंटीवार यांच्या स्वागताचा विषय राजकीय वर्तुळात कुचेष्टेचा विषय झाला आहे. 

पिंपरीतील एच. ए मैदानावर असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट हॉर्टीकल्चर असोसिएशनतर्फे आंतरराष्ट्रीय फुलांच्या तीन दिवसीय आयोजित प्रदर्शनाचे मुनगंटीवार यांच्या हस्ते आज उद्‌घाटन झाले.  खासगी कार्यक्रम असला तरी केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्री शहरात असल्यास राज शिष्टाचारानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी, अधिका-यांनी त्यांचे स्वागत करण्याचे संकेत आहेत. त्याचे पालन केले जाते. आज मात्र अर्थमंत्री असूनही ना पदाधिका-यांनी,  ना अधिका-यांनी स्वागत केले. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील हे तर मंत्र्यांच्या दौ-याबाबत अनभिज्ञ होते. त्यांना याची कल्पना देण्याची तसदी देखील कोणी घेतली नाही.

तसेच मुनगंटीवर पक्षाचे ‘हेवीवेट’ नेते असूनही यांच्या मागे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा गराडा नव्हता. निमित्त ठरले स्पेन दौ-याचे…परंतु, उपमहापौर, खासदार, आमदार, स्थायी समिती सभापती, 80 पैकी एकही नगरसेवक किंवा पक्षाचे पदाधिकारी शहरात असूनही त्यांच्याकडे फिरकला नाही. केवळ सरचिटणीस प्रमोद निसळ एकमेव उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून अर्थमंत्री व वनमंत्री असलेले सुधीर मुनगंटीवर ओळखले जातात. त्यांच्याकडे राज्याच्या आर्थिक नाड्या आहेत. तसेच मुनगंटीवार हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देखील राहिले होते. ते पक्षाचे महत्वाचे नेते असतानाही शहरात येऊनही त्यांच्याकडे कोणीच फिरकले नाही. पिंपरी महापालिकेत प्रथमच भाजपची एकहाती सत्ता आली आहे. शहरात एका राज्यसभा खासदार, दोन आमदार, दोन  महत्वाची महामंडळे आहेत. तर, पक्षाचे 80 नगरसेवक आहेत. यापैकी एकही जणही अर्थमंत्री मुनगंटीवर यांच्याकडे फिरकला नाही. तसेच पालिकेच्या अधिका-यांनी देखील त्यांचे स्वागत केले नाही. त्यामुळे भाजपचा हाच का? शिष्टाचार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.