Pimpri: …जेव्हा उपमहापौरांचा फोन आयुक्त उचलत नाहीत !

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावरुन पदाधिका-यांसह सर्वंच नगरसेवक हैराण झाले आहेत. त्यातच पाणीपुरवठा संदर्भात विचारणा करण्यासाठी उपमहापौरांनी आयुक्तांना दोनवेळस फोन केला. परंतु, आयुक्तांनी फोन उचलला नाही. त्याचे पडसाद आज (शनिवारी) झालेल्या पाणीपुरवठा विभागाच्या बैठकीत उमटले. तसेच अनेक सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी आपले देखील फोन उचलले जात नसल्याची व्यथा मांडत, फोन उचलण्याची आयुक्तांना तंबी दिली.

पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागात पाणीपुरवठ्याची मोठी समस्या आहे. विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. नागरिक आपला संताप नगरसवेकांकडे व्यक्त करतात. तर, नगरसेवकांनी जाब विचारण्यासाठी अधिका-यांना फोन केल्यास त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी केल्या.

उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी शुक्रवारी (दि.28) पाणीपुरवठा संदर्भात आयुक्त श्रावण हर्डीकर यांना फोन केला. पहिल्यावेळेस फोन उचलला गेला नाही. दुस-यावेळी देखील फोन उचलला नाही. याचे पडसाद आज झालेल्या बैठकीत उमटले. तसेच आपले देखील फोन उचलले जात नसल्याची व्यथा सत्ताधारी पक्षाच्या अनेक नगरसेवकांनी मांडली. आयुक्तांनी उपमहापौर, नगरसेवकांचा फोन उचलणे अपेक्षित असल्याचे, नगरसेवक तुषार कामठे म्हणाले. त्यांना नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी पाठिंबा दिला.

त्यावर आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘बैठकीत असल्याने उपमहापौरांचा फोन उचलता आला नाही. त्यांना एसएमएस केला होता. फोन टाळण्याचा आपला हेतू नाही’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.