Pimpri: कोरोना; शहरात ‘गुड फ्रायडे’ची उपासना ‘ऑनलाईन’

एमपीसी न्यूज – लॉककडाऊनमुळे पिंपरी-चिंचवड मधील विविध भागांमध्ये आज (शुक्रवारी) ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र ‘गुड फ्रायडे’ची उपासना मोठ्या भक्तिभावाने ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली.

प्रभू येशू ख्रिस्तानी अखिल मानव जातीच्या पापक्षालनासाठी क्रूसखांबावर दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून जगभरात गुड फ्रायडे ( उत्तम शुक्रवार) हा पवित्र दिवस म्हणून पाळला जातो. लॉकडाऊनमुळे पिंपरी-चिंचवड मध्येही शुक्रवारी या पवित्र दिवसा निमित्त फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये उपासना घेण्यात आली.

के.डी. सी. चर्च ऑफ क्राईस्ट, विजयनगर, काळेवाडीचे रेव्ह. सुनील चोपडे पाळक यांनी आपल्या निवासस्थानाहून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ख्रिस्ती बांधवांसोबत सवांद साधला. त्यांनी क्रूस खांबावर खिळविण्यात आले असता प्रभू येशू ख्रिस्तानी उच्चारलेल्या 7 शब्दावर (वाक्यावर) बायबलच्या माध्यमातून संदेश दिला. या संदेशातून त्यांनी सांगितले की, गुड फ्रायडे किंवा उत्तम शुक्रवार हा उत्तम ( चांगला ) का ? तर जगाच्या इतिहासात या दिवशी पृथ्वीवरील अखिल मानव जातीच्या उद्धारासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने क्रूसावर/वधस्तंभावर आपला प्राण परमेश्वराकडे सोपवला.

जगाला प्रीतीचे व क्षमेचे अद्भूत दर्शन प्रभू येशूच्या जीवनामुळे घडले व प्रभू येशूचे जीवन मरण व पुनरूत्थान ( मरणावरील विजय ) हि दैवी योजना होती.

तसेच जगभरात हाहा:कार माजवणाऱ्या कोरोना या आजारासाठी देखील प्रार्थना करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पोलीस, डॉक्टर, नर्स, अत्यावश्यक सेवे मध्ये कार्य करणारे सर्व कर्मचारी, सर्व मानावजाती साठी प्रार्थना करण्यात आली.

गेल्या चाळीस दिवसापासून ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र लेन्थ महिना सुरू होता. या चाळीस दिवसांच्या काळात ख्रिश्चन बंधू भगिनी उपवास आणि प्रार्थना करतात. घरोघरी कॉटेज प्रेअरचे आयोजण केले जाते. गुड फ्रायडेच्या आधी गुरुवारी सांयकाळी मौदी गुरुवार निमित्त प्रार्थना सभा होते. परंतु, यंदा कोरोनाच्या संकटामुळे या सर्व प्रार्थना या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून घेण्यात आल्या.

दरम्यान, रविवारी प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानिमित्त ईस्टर संडे हा सण देखील फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून साजरा केला जाणार आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.