Pimpri corona News: पॉझिटिव्ह न्यूज ! ‘युके स्ट्रेन’चे तीनही रुग्ण कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज – परदेशातून हवाई मार्गे पिंपरी-चिंचवड शहरात आलेले आणि युके स्ट्रेनचे कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले तीनही रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 14 दिवसांच्या उपचारानंतर त्यांना आज (मंगळवारी) नवीन भोसरी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या पिंपरी- चिंचवड शहरातील 268 प्रवाशांचा शोध घेण्यात आला होता. त्यापैकी सात प्रवाशांचे नमुने राष्ट्रीय विषाणू संस्थेला (एनआयव्ही) यूके स्ट्रेन करीता जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठविले होते. त्यात तिघांचे रिपोर्ट निगेटीव्ह, तर तिघांचे रिपोर्ट यूके स्ट्रेन B.1.1.7 करीता पॉझिटीव्ह आले होते.

परदेशातून आलेल्या पिंपळे सौदागर येथील या तीनही रुग्णांना 29 डिसेंबर 2020 रोजी नवीन भोसरी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते.

महापालिका वैद्यकीय विभागाने त्यांचे नमुने यूके स्ट्रेन तपासणीसाठी ‘एनआयव्ही’कडे पाठविण्यात आले होते. 7 जानेवारी रोजी त्यांना नव कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यात त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

कोरोनामुक्त झाल्याने आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना आता 14 दिवस विलगीकरणात रहावे लागणार आहे, असे सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.