Pune News : पक्ष्यांच्या वाहतुकीवर सरसकट बंदी नाही : पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह

एमपीसी न्यूज : महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’ दाखल झाला असला तरी तुर्तास कुठलाही धोका नाही. राज्याअंतर्गत आणि परराज्यातून कोंबड्यांसह अन्य पक्ष्यांच्या वाहतुकीवर सरसकट बंदी असणार नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिले.

औंध येथील पशुसंवर्धन आयुक्तालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त डॉ.धनंजय परकाळे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले, महाराष्ट्रात बर्ड फ्लू दाखल झाल्याचे सिद्ध झाले आहे. परभणी येथील मुरंबा येथील मृत पक्ष्यांचे नमुने पुणे पशुवैद्यकीय तपासणी प्रयोगशाळेत आले होते.

अमरावती, परभणी, बीड, लातूर, यवतमाळ, अकोला जिह्यात एकूण 218 पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाला आहे. त्यामध्ये कुक्कुट, वन्यजीव आणि स्थलांतरीत पक्षांचा समावेश आहे. कोंबड्या, कावळे, बगळे, पोपट इत्यादी पक्ष्यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागात जास्त प्रमाणात अचानक मृत पक्षी आढळल्यास पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या 18002330418 टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच कोणीही मृत पक्ष्यांना हाताळू नये, शवविच्छेदन करु नये तसेच परस्पर विल्हेवाट लावू नये, असे आवाहन आयुक्तांनी केले.

बर्ड फ्लूची साथ आली असली तरी मानवाला कुठलाही संक्रमणाचा धोका नाही. कोणतेही चिकन व अंडी 70 अंश सेल्सियसपर्यंत शिजवून खाल्यास धोका नाही.

पोल्ट्री चिकन व अंडी खाणे पुर्णत: सुरक्षित आहे. परंतु, तरीही चिकन विक्रेत्यांनी शक्यतो मास्क, हँडग्लोव्हज वापरणे ऐच्छिक आहे. तसेच राज्याअंतर्गत व परराज्यातील सर्व प्रकारच्या पक्ष्यांच्या वाहतुकीवर सरसकट बंदी असणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.