Pimpri crime News : चाकण, चिंचवड, देहूरोड परिसरातील अवैध धंद्यांवर पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज – चाकण परिसरातील एका दारूभट्टीवर आणि जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला. तर चिंचवड येथे एका हॉटेलमध्ये ठेवलेला दारूसाठा चिंचवड पोलिसांनी जप्त केला. देहूरोड पोलिसांनी एका व्यक्तीकडून तीन हजारांची दारू जप्त केली. या कारवाया सोमवारी (दि. 7) करण्यात आल्या आहेत.

सुखदेव महिंद्रसिंग राठोड (वय 22, रा. फलकेवस्ती, मोई) याने मोई येथे इंद्रायणी नदीच्या काठावर दारूभट्टी सुरु केली होती. त्या दारूभट्टीवर सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारला. त्यात पोलिसांनी तयार दारू, दारू तयार करण्याचे रसायन आणि साहित्य असा एकूण चार लाख 26 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

वासोली गावात अंकुश महादेव उगलमुगले (वय 30, रा. भांबोली, ता. खेड) हा सोरट नावाचा जुगार खेळताना आढळून आल्याने चाकण पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली.

चिंचवड पोलिसांनी तानाजी बळीराम कांबळे (वय 46, रा.वाल्हेकरवाडी, चिंचवड) याला अटक केली. त्याने वाल्हेकरवाडी येथील गोल्डन हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे 874 रुपयांची दारू ठेऊन दारूचा गुत्ता चालवल्याबाबत ही कारवाई करण्यात आली आहे.

तीन हजारांची गावठी दारू बाळगल्या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. गोपीनाथ मुकुंद भोसले (वय 38, रा. मामुर्डी, ता. हवेली) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.