Pimpri Crime News : नगर अर्बन बँक फसवणूक प्रकरणी दोघांना पोलीस कोठडी; दोघांना न्यायालयीन कोठडी

एमपीसी न्यूज – नगर अर्बन को-ऑप बँकेच्या 22 कोटींच्या फसवणूक प्रकरणी सोमवारी (दि. 8) अटक करण्यात आलेल्या दोघांना मंगळवारी (दि. 9) मोरवाडी, पिंपरी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना सोमवार (दि. 15 मार्च) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच याच प्रकरणात यापूर्वी पोलीस कोठडीत असलेल्या दोघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

आशुतोष सतीश लांडगे (वय 38, रा. अहमदनगर), जयदीप प्रकाश वानखेडे (वय 34, रा. पुणे, मूळ रा. श्रीरामपूर) असे पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

यापूर्वी नवनीत शांतीलाल सूरपुरिया (वय 55, रा. अहमदनगर) आणि यज्ञेश बबन चव्हाण (वय 25, रा. संभाजीनगर, चिंचवड) या दोघांना अटक केली होती. सूरपुरिया आणि चव्हाण या दोन्ही आरोपींना मंगळवारपर्यंत (दि. 9) पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

त्यामुळे त्यांनाही मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर अर्बन बँक फसवणूक प्रकरणी महादेव पंढरीनाथ साळवे (वय 56, रा. अहमदनगर) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात 25 जानेवारी 2021 रोजी फिर्याद दिली आहे.

बँकेच्या चिंचवड येथील शाखेत 26 मार्च 2018 ते 25 जानेवारी 2021 दरम्यान हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.