Pimpri: मदनलाल धिंग्रा मैदानावर राजकीय सभेस परवानगी देऊ नये – दत्ता साने

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राधिकरण येथील मदनलाल धिंग्रा मैदानावर राजकीय सभा, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास मनाई आहे. तसा पालिकेच्या स्थायी सभेत ठराव करण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 3 नोव्हेंबरला होणारी सभा धिंग्रा मैदावर घेऊ नये. त्याला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे. परवानगी दिल्यास राष्ट्रवादीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात साने यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असताना मदनलाल धिंग्रा मैदान शहरातील खेळाडूंसाठी खेळाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या अद्ययावत सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. हिरवळ, मैदानाचे सपाटीकरण, अत्याधुनिक दिवे, मैदानासाठी स्प्रिंक्लर सिस्टिम इत्यादी अत्याधुनिक सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. या मैदानावर परिसरातील व शहरातील होतकरु खेळाडू नित्य सराव करीत असतात. त्यातच दिवाळीच्या सुट्‌ट्या देखील लागणार आहेत. सुट्टीच्या काळात विद्यार्थ्यांना खेळायला मैदान खुले असणे आवश्यक बाब आहे. या ठिकाणी जर सभा घेण्यात आली. तर. महापालिकेने आतापर्यंत या मैदानावर केलेला खर्च वाया जाणार आहे. पालिकेचे आर्थिक नुकसान होणार आहे.

मैदानावरील पुरविण्यात आलेल्या अत्याधुनिक सुविधा खराब होण्याची शक्यता आहे. तसेच मैदान व मैदानावरील हिरवळही खराब होऊन खेळांडूंना हे मैदान वापरता येणार नाही. भाजपच्या पदाधिका-यांनी या मैदानावर सभा घेण्याचे नियोजन केले आहे. शहरातील खेळाडूंचे व विद्यार्थ्याचे हित लक्षात घेऊन प्रचाराच्या सभेस परवानगी देऊ नये. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा साने यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.