Pimpri: पिंपरी गावात पाच ठिकाणी उभारणार सुलभ शौचालय

पावणेआठ कोटी रुपये खर्च; स्थायी समितीची मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे प्रभाग क्रमांक 21 पिंपरीमध्ये पाच ठिकाणी सुलभ शौचालय बांधण्यात येणार आहेत. या कामासाठी सुमारे 1 कोटी 77 लाख रुपये खर्च येणार असून त्याला स्थायी समितीने आज (मंगळवारी) मान्यता दिली.

महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणा-या प्रभाग क्रमांक 21 पिंपरीमध्ये महापालिकेतर्फे पाच ठिकाणी सुलभ शौचालय बांधण्यात येणार आहेत. ‘पैसे द्या अन् वापरा’ या तत्वावर महिला आणि पुरूषांसाठी ही शौचालये तसेच स्वच्छतागृहे असणार आहेत. अय्यप्पा मंदिराजवळ दोन पुरूष आणि दोन महिला शौचालय आणि एक स्वच्छतागृह, राधिका चौकात एक पुरूष व एक महिला शौचालय आणि एक स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहेत.

त्याचप्रमाणे पीसीएमसी कॉर्टर्स येथे सहा पुरूष आणि तीन महिला शौचालय आणि चार स्वच्छतागृह, पिंपरीगाव पीएमपीएल बसस्थानकाजवळ सहा पुरूष व तीन महिला शौचालय आणि चार स्वच्छतागृह, तर शिवशक्ती माता मंदिरामागे दोन पुरूष व एक महिला शौचालय आणि दोन स्वच्छतागृह, अशा पाच ठिकाणी एकूण 27 शौचालय आणि 12 स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहेत. निविदा न मागविता थेट पद्धतीने मेसर्स सुलभ इंटरनॅशनल सोशिएल सर्व्हिस ऑर्गनायझेशन या संस्थेकडून हे काम करण्यात येणार आहे.

या कामासाठी 1 कोटी 39 लाख 91 हजार 889 रुपये असा अंदाजपत्रकिय खर्च अपेक्षित आहे. त्यावर 0.5 टक्के इन्शूरन्स, 12 टक्के जीएसटी आणि 15 टक्के कार्यवाही भार शुल्क लागू होणार आहे. त्यानूसार पिंपरीमध्ये पाच ठिकाणी बांधण्यात येणा-या सुलभ शौचालयासाठी 1 कोटी 77 लाख 6 हजार 665 रुपये इतका खर्च येणार आहे. स्थायी समिती सभेत त्याला मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.