Pimpri : एमपीसी न्यूजचे मुख्य संपादक विवेक इनामदार यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज – अखिल मराठी पत्रकार संस्था (रजि.) संलग्न पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचा (Pimpri) मानाचा ‘उत्कृष्ट पत्रकारिता’ हा पुरस्कार पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ पत्रकार, एमपीसी न्यूज संस्थेचे मुख्य संपादक विवेक इनामदार यांना जाहीर झाला आहे. रोख 51 हजार रुपये, शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी पत्रकार दिनाच्या निमित्ताने शहरातील एका पत्रकाराचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यावर्षी हा पुरस्कार सोहळा मंगळवार दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी सकाळी 12 वाजता काळेवाडी येथील हॉटेल ॲम्बीयन्स या ठिकाणी संपन्न होणार आहे.

तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नितिन यादव, वाल्मिक कुटे, एम ए हुसेन व माधव पाटील यांना देखील पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

विवेक इनामदार हे मागील 4 दशकापासून पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात पत्रकारितेच्या क्षेत्रात अविरत कार्यरत आहेत. प्रिंट व डिजिटल मीडिया क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले आहे. लोकसत्ता वृत्तपत्रात त्यांनी अनेक वर्षे पत्रकार म्हणुन कार्य केले आहे. पिंपरी चिंचवड परिसरात 15 वर्षापूर्वी एमपीसी न्यूज हे वेबपोर्टल सुरू केले असून हे वेबपोर्टल भारतातील नामवंत व सर्वाधिक युजर्स – वाचक असलेल्या वेबपोर्टल पैकी एक आहे.

या पुरस्कार वितरण सोहळ्यास दैनिक प्रभातचे माजी संपादक व प्रसिद्ध राजकीय समीक्षक अरुण खोरे, मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, अण्णा बनसोडे, उमा खापरे, माजी महापौर उषा ढोरे, भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष तुषार कामठे, आय काँग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम, शिवसेना शहराध्यक्ष सचिन भोसले, शिवसेना जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाल्हेकर, मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, आप शहराध्यक्ष चेतन बेंद्रे आदी उपस्थित राहणार आहेत.

पुरस्कार सोहळ्याचे स्वागताध्यक्ष पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर व शिवसेना मावळ लोकसभा (Pimpri) संघटक संजोग वाघेरे पाटील हे आहेत.

पुरस्कार सोहळा ठीक 12 वाजता सुरू होणार असून डिजिटल मीडिया क्षेत्रातील तज्ञ विश्वनाथ गरुड ‘आजचा डिजिटल मीडिया’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

सामाजिक व राजकीय पुरस्कारामध्ये 1) नितीन यादव (प्रशासन भूषण पुरस्कार), 2) वाल्मिक कुटे (समाज सेवा पुरस्कार), 3)एम ए हुसेन (रुग्ण सेवा पुरस्कार),
4) माधव पाटील (पर्यावरण प्रेमी पुरस्कार) यांचा समावेश असून संसद महारत्न पुरस्कार प्राप्त व संसदचे सर्वोच्च पद पिठासीन अध्यक्ष पदावर काम करण्याची संधी
मिळालेले मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती अखिल मराठी पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापुसाहेब गोरे, पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष दादाराव आढाव व डिजिटल मीडिया अध्यक्ष भीमराव तुरुकामारे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.