Pimpri : रेशनिंग दुकानदार, कामगार व पुरवठा अधिकाऱ्यांना विमा संरक्षण न दिल्यास 1 जूनपासून धान्य उचलणे व वितरण बंद – गजानन बाबर

एमपीसी न्यूज – शासनाने रेशनिंग दुकानदार, कामगार व पुरवठा अधिकारी यांना विमा संरक्षण न दिल्यास 1 जूनपासून रेशनिंग धान्य उचलणे व वितरण करणे बंद करणार असल्याचा इशारा ऑल महाराष्ट्र रेशनिंग शॉपकीपर फेडरेशनचे अध्यक्ष व माजी खासदार गजानन बाबर यांनी दिला आहे.

याबाबत त्यांनी प्रधान सचिव यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रेशनिंग दुकानदार तसेच त्यांचे कामगार व पुरवठा विभागातील अधिकारी कोरोना साथीच्या प्रादुर्भाव काळात जीवावर उदार होऊन काम करत आहेत. या कामगारांना सरकारने विमा संरक्षण देण्याबाबत ऑल महाराष्ट्र रेशनिंग शॉपकीपर फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना 2 एप्रिल रोजी निवेदन दिले होते.

28 एप्रिल रोजी रेशनिंग कामगारांना विमा संरक्षण देण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविला असल्याचे सांगितले होते. मात्र, या बाबतीत अजून काहीच निर्णय झाला नसल्याचे दिसत आहे.

रास्त भाव रेशनिंग दुकानदार हे मध्यमवर्गीय असून कोरोना सारख्या आजाराचा धोका पत्कारून धान्य वितरणाचे काम करत आहेत. मुंबई, पुणे याठिकाणी काही रेशनिंग दुकानदारांना कोरोना संसर्ग झाला आहे.

अशा परिस्थितीत जर त्यांना विमा संरक्षण दिले नाही तर त्यांचे कुटुंब रस्त्यावर येईल.

रास्तभाव रेशनिंग दुकाने ही अधिकृत शासकीय दुकाने आहेत. त्यामुळे तात्काळ त्यांना व त्यांच्या कामगार आणि पुरवठा अधिकारी यांना
शासनाकडून विमा संरक्षण देण्यात यावे; अन्यथा 1 जून पासून महाराष्ट्र राज्यातील सर्व रास्त भाव रेशनिंग दुकानदार शासनाकडून धान्य उचलणार नाहीत व वितरणही करणार नाहीत, असा इशारा बाबर यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.