Talegaon: ट्रकची दुचाकीला समोरून धडक; एकाचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर जखमी

Talegaon: Truck hits two-wheeler; One died on the spot, one was seriously injured

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने समोरून आलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना चाकण-तळेगाव रोडवर इंदोरी बायपास रोडजवळ, इंदोरी येथे मंगळवारी (दि. 19) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.

तुकाराम बाबुराव खुडे (वय 58, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ. मूळ रा आर्वी, ता. जुन्नर) यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सूर्यकांत तुकाराम खुडे (वय 26) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर उमेश दिगंबर बावरकर (वय 27, रा. सोमवार पेठ, पुणे) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यानुसार ट्रक ट्रेलर (एम एच 46 / एच 2678) वरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक ट्रेलर वरील अज्ञात चालक भरधाव वेगात ट्रक चालवत होता. रात्री साडेदहाच्या सुमारास इंदोरी येथे चाकण-तळेगाव रोडवर इंदोरी बायपास रोडजवळ ट्रक एका वाहनाला ओव्हरटेक करीत होता. त्यावेळी मयत सूर्यकांत आणि त्याचा जखमी मित्र उमेश दुचाकीवरून (एम एच 12 / एल एन 894) येत होते. ट्रकने सूर्यकांत यांच्या दुचाकीला समोरून जोरात धडक दिली.

या अपघातात सूर्यकांत ट्रकच्या खाली पडला. त्याच्या पायावरून ट्रक ट्रेलर गेला. त्यात तो गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. तर सूर्यकांत याचा मित्र उमेश हा गंभीर जखमी झाला. दुचाकीचेही या अपघातात नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती न देता ट्रक चालक पळून गेला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.