Pimpri : भारुडातून मराठवाड्याच्या वस्तुस्थितीवर प्रकाश; कृष्णाई उळेकर हिचे अस्सल सादरीकरण

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त कार्यक्रम

एमपीसी न्यूज – डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे तसेच विलासराव देशमुख अशा महान व्यक्तीमत्वाच्या इच्छाशक्तीचे दाखले देत अस्सल भारूड हा प्रवचनाचा कार्यक्रम मराठवाड्याची कन्या कृष्णाई प्रभाकर उळेकर हिने सादर केला. इच्छा शक्तीच्या जोरावर सर्वसामान्य माणूस सर्वोच्च स्थानावर कसा पोहोचतो. रंकाचा राजा कसा होतो, याचा उलगडा कृष्णाईने भारुडाच्या माध्यमातून करून दिला.

मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठवाडा भूषण पुरस्कार वितरण समारंभात कृष्णाई उळेकर हिने हा कार्यक्रम अस्सल मराठवाड्या शैलीत सादर केला. या कार्यक्रमाला कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आमदार महेश लांडगे, लातूरचे माजी आमदार शिवाजीराव कुवेकर, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पक्षनेते एकनाथ पवार, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमात मंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते डॉ. भाऊसाहेब जाधव यांना मराठवाडा भूषण जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, मधुकर तेलंग (प्रशासकीय), डॉ. रमेश जोशी (वैद्यकीय), भूषण कदम (सामाजिक) आणि आण्णा जोगदंड (वृक्षसंवर्धन) यांनाही मराठवाडा भूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. यावेळी कृष्णाई उळेकर हिचा देखील सन्मान करण्यात आला. मान्यवरांना पुरस्कार वितरण झाल्यानंतर कृष्णाईने मराठवाड्याची लोककला भारूड सादर केले. इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वोच्च स्थान पटकविलेल्या महान व्यक्तीमत्वाचा इतिहास भारुडाच्या माध्यमातून उलघडून सांगितला. दिवसेंदिवस मराठवाड्याला नैसर्गिक अपत्तीने कसे ग्रासले आहे. त्यामुळे मराठवाडा दुष्काळग्रस्त भाग कसा बनत चालला आहे. त्याला जबाबदार दुसरे कोणी नसून आपणच आहोत. परंतु, ही चूक आपल्या लक्षात येत नसल्याची वस्तुस्थिती कृष्णाईने सर्वांच्या लक्षात आणून दिली.

वारंवार पडणारा दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, मुलींचे लग्न, मुलांचे शिक्षण अशा प्रश्नांमुळे कर्जबाजारी झालेला शेतकरी आत्महत्या करू लागला आहे. शेतक-यांनी आत्महत्या करू नये, शेजारील व्यक्तींनी अशा शेतक-यांना मानसिक आधार देण्याचा संदेश कृष्णाईने दिला. या मुद्याचा आधार घेत हजारो कोंटीचे कर्ज उचलून तसेच बँकेला गंडा घालून परदेशात पलायन केलेला विजय माल्ल्या आणि निरव मोदी यांच्यावर देखील कृष्णाईने सडेतोड शब्दांत भारुडाच्या माध्यमातून टीका केली. अशा अनेक मुद्यांवर प्रकाश टाकत तिने भारुड सादरीकरणातून प्रेक्षकांचे प्रबोधन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.