Pimpri: महापालिकेने एका मृत जनावराची विल्हेवाट लावण्यासाठी मोजले दोन हजार 165 रुपये!

चार वर्षात एक हजार 508 मृत जनावरांची विल्हेवाट, सुमारे 32 लाख 64 हजार रुपयांचा खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीतील मागील चार वर्षात शहरातील एक हजार 508 मृत जनावरांची विल्हेवाट लावल्याचा दावा महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने केला आहे. त्याकरिता सुमारे 32 लाख 64 हजार रुपये मोजले आहेत. एका जनावराची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने तब्बल दोन हजार 165 रुपये मोजले आहेत. 14 वर्षांपासून एकाच ठेकेदाराकडून हे काम करुन घेतले जात आहे. पुन्हा त्याच ठेकेदाराला तीन वर्षासाठी एक कोटी 13 लाख रुपयांमध्ये काम देण्याचा घाट घातला होता. त्याला स्थायी समितीने ब्रेक लावला असून फेरनिविदा करण्याचे आदेश दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज (बुधवारी) पार पडली. विलास मडिगेरी सभेच्या अध्यक्षस्थानी होते. विषयपत्रिकेवरील 42 विषयांना मान्यता देण्यात आली. तर, आयत्यावेळी 14 अशा एकूण 109 कोटी 58 लाख रुपयांच्या 57 विषयांना मान्यता देण्यात आली. चार विषय तहकूब करण्यात आले. दोन विषय पाठीमागे घेतले.

पिंपरी-चिंचवड शहरात मृत्यू झालेल्या जनावरांची महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत विल्हेवाट लावली जाते. मागील चार वर्षात 2016 पासून आजपर्यंत एक हजार 508 जनावरे मृत झाली आहेत. त्यामध्ये गाय 962, बैल 59, म्हैस 360, घोडा 93 आणि इतर 34 अशा एक हजार 508 मृत जनावरांची महापालिकेने विल्हेवाट लावल्याचा दावा केला आहे.

एका जनावराची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने तब्बल दोन हजार 165 रुपये मोजले आहेत. चार वर्षात त्यावर तब्बल 32 लाख 64 हजार रुपये खर्च झाले आहेत. दिल्लीवाला एॅन्ड सन्स या ठेकेदाराकडून काम करुन घेतले आहे. 14 वर्षांपासून त्यांच्याकडेच हे काम आहे.

मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली. तीन वर्षाच्या कालावधी करिता निविदा मागविल्या होत्या. त्यामध्ये चार निविदा प्राप्त झाल्या. त्यापैकी दोन अपात्र ठरल्या तर, दोन पात्र ठरल्या. त्यामध्ये दिल्लीवाला एॅन्ड सन्स यांची एक कोटी 13 लाख 94 हजार आणि के.वाय. इंटरप्रायजेस यांची एक कोटी 19 लाख 70 हजार रुपयांची निविदा प्राप्त झाली.

त्यापैकी दिल्लीवाला अँड सन्स यांची 21 टक्के कमी दराची आली. त्यामुळे पुन्हा त्याच ठेकेदाराला काम देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला होता. 14 वर्षापासून हाच ठेकेदार काम करत आहे. चार जणांनी सहभाग घेतला. परंतु, दोन निविदा अपात्र ठरल्या होत्या. निविदा प्रक्रियेत स्पर्धा झाली नाही. त्यामुळे फेरनिविदा सादर करण्याचे आदेश स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी दिले.

याबाबत बोलताना स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी म्हणाले, जनावरांची विल्हेवाट लावण्याचे काम दिल्लीवाला अँड सन्स हाच ठेकेदार मागील 14 वर्षापासून करत आहे. निविदा प्रक्रियेत चार निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी दोन बाद झाल्या. त्यामुळे दोनच निविदा राहिल्याने स्पर्धा झाली नाही. त्यामुळे फेरनिविदा करण्याचा आदेश दिला आहे. प्रति जनावरे दराने निविदा काढण्यास शक्य झाल्यास त्याप्रमाणे निविदा काढावी. यासाठी खर्चा कमी करता येईल का याचा विचार करावा. क्षेत्रीय कार्यालयानिहाय एजन्सी नियुक्त करण्याचा विचार करावा. नवीन निविदा काढताना सध्याच्या अटी-शर्ती शिथील कराव्यात. त्यानुसार फेरनिविदा करावी. आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांचे मार्गदर्शन घ्यावे. निकोप स्पर्धा होईल असा विचार करुन फेरनिविदा काढण्याचे निर्देश दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.