Pimpri News: : दंडात्मक कारवाईच्या पावतीत फेरफार करणा-या बीट निरीक्षकांची खातेनिहाय चौकशी

एमपीसी न्यूज – अतिक्रमणावर केल्या जाणा-या दंडात्मक कारवाईच्या पावतीत फेरफार करणे महापालिकेच्या दोन बीट निरीक्षकांना चांगलेच महागात पडले आहे. पावत्यांमध्ये फेरफार करुन शासकिय पैशांचा अपहार केल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास येत असल्याचा ठपका ठेवत त्यांची खातेनिहाय चौकशी सुरु करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.

प्रियांका शिंदे, दिपाली जगदाळे अशी खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आलेल्या बीट निरीक्षकांची (अभियांत्रिकी सहाय्यक) नावे आहेत. दोघीही गट ‘क’ दर्जाच्या पदावर कार्यरत आहेत. शिंदे, जगदाळे यांची अतिक्रमणाची कारवाई अधिक क्षमतेने व्हावी यासाठी बीट निरीक्षक म्हणून ‘क’ क्षेत्रीय कार्यालयातील धडक कारवाई पथकात नेमणूक केली. 29 मार्च रोजी अतिक्रमण विषयक कारवाई करत असताना दंडात्मक कारवाईपोटी वसुल केलेल्या रक्कमेच्या महापालिकेच्या सामान्य पावतीमध्ये गैरव्यवहार व अफरातफर करुन महापालिकेच्या रकमेचा अपहार केल्याची तक्रार 30 मार्च रोजी महापालिकेकडे आली.

शिंदे, जगदाळे यांनी राजेंद्र मटके यांच्या हातगाडीविरुद्ध अतिक्रमण कारवाई करताना सामान्य पावतीमध्ये दंडात्मक शुल्कापोटी 1 हजार रुपयांची पावती केली असल्याचे एका प्रतीवर नमुद आहे. त्याच्या पावती क्रमांकाच्या दुस-या प्रतीवर मटके यांचे नाव असून दंडात्मक शुल्कापोटी वसुल केलेल्या पावतीवर काटा व कॅरेट 2 हजार रुपयांची पावती केली असल्याचे निदर्शनास आले. समान क्रमांकाच्या पावतीच्या प्रतीवरील स्वाक्षरी व रक्कमेमध्ये भिन्नता दिसून आली.

याबाबत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागविला. सामान्य पावती पुस्तकावरील नोंदीमधील तफावत असल्याबाबत शिंदे व जगदाळे यांनी खुलासा सादर केला. पण, हा खुलासा संयुक्तिक वाटत नाही असा अभिप्राय क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी दिला होता. त्यानुसार शिंदे, जगदाळे यांनी शासकीय पैशांचा अपहार करुन कर्तव्यात सचोटी राखली नाही. आर्थीक बाबींशी गंभीर स्वरुपाचे गैरवर्तन केले.

याशिवाय प्रियांका शिंदे या कार्यालयात आलेल्या नागरिकांशी, पदाधिकाऱ्यांशी सौजन्याने वागत नाहीत. उद्धटपणे बोलतात. त्यामुळे त्यांची इतर क्षेत्रीय कार्यालयात बदली करण्याच्या ठरावाला देखील सर्वानुमते मान्यता दिली आहे. शिंदे आणि जगदाळे या दोघींनीही महापालिकेच्या पैशांमध्ये अफरातफर केल्याचे सकृतदर्शनी निदर्शास आले आहे. त्यामुळे दोघींनी शासकीय कर्तव्यात सचोटी न राखता अशोभनीय वर्तन केल्यामुळे त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त पाटील यांनी दिले आहेत. या आदेशाची त्यांच्या सेवा पुस्तकात नोंद केली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.