Pimpri news: पदभार स्वीकारताना राजू मिसाळ यांच्याकडून पूजा-अर्चा; ‘अंनिस’चा आक्षेप

पुरोगामी विचारांच्या पक्षाच्या नगरसेवकाने धार्मिक सोहळे केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका विरोधी पक्षनेते पदाचा पदभार स्वीकारताना राजू मिसाळ यांनी कार्यालयात पूजा-अर्चा केल्याने त्यांच्यावर अंनिस आणि पुरोगामी संघटनांकडून आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरोगामी विचारांचा असल्याचे सांगतो आणि त्यांच्याच पक्षाचा विरोधी पक्षनेता पालिका कार्यालयात पूजा-अर्चा करून पक्षाच्या ध्येय-धोरणाला हरताळ फासत असल्याचा विरोधाभास यानिमित्ताने समोर आला आहे. यावेळी कोरोनाच्या नियमांचे देखील उल्लंघन झाले आहे.

राजू मिसाळ यांची पालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे. त्यांनी बुधवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. त्यापूर्वी मिसाळ यांनी आपल्या दालनाची विधीवत वास्तूशांती केली. वा. ना. अभ्यंकर यांच्या उपस्थितीत ही पूजा झाली. श्री गणेश प्राणप्रतिष्ठाही करण्यात आली.

शिवाय सत्यनारायण पूजा व मंत्रोच्चारण करण्यात आले. पुरोगामी विचारांच्या पक्षाच्या नगरसेवकाने धार्मिक सोहळे केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे महापालिका, कोणत्याही शासकीय कार्यालयात धार्मिक विधी करता येत नाहीत. पण मिसाळ यांनी पहिल्याच दिवशी नियमांचे उल्लंघन केले आहे.

यावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) आक्षेप घेतला आहे. राजू मिसाळ यांनी कार्यालयात धार्मिक विधी कर्मकांड केले. यापूर्वी देखील पालिकेत सत्यनारायण पूजा झाली होती. त्यावेळीही पालिकेत कर्मकांड करू नये, अशा गोष्टी होऊ नयेत असे पत्र दिले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी कधीही अशा गोष्टींना प्रोत्साहन दिले नाही. मिसाळ यांनी त्यांच्याकडून आदर्श घेतला पाहिजे. कोरोनाच्या नियमांचे देखील त्यांनी उल्लंघन केले आहे.

शहर कोरोना मुक्त करण्याचे गणपतीला साकडे – मिसाळ

माझ्या आयुष्यातील कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना मी गणेश पूजन करतो. पालिकेत देखील गणपती बसविला जातो. दहा दिवस गणपतीची पूजा होत असते.

पिंपरी- चिंचवड शहर कोरोनामुक्त होऊ दे, असे साकडे गणपतीला घातले आहे. मित्राने भेट दिलेल्या मूर्तीचे पूजन केले. बाकी काही धार्मिक कार्यक्रम केला नाही, असे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी आपली बाजू स्पष्ट करताना सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.