Pimpri News : ‘पे अँड पार्क’ योजना रद्द करा; अन्यथा खळखट्याक : मनसेचा इशारा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात ‘पे अँड पार्क’च्या नावाखाली सुरू असलेली वसुली बंद करावी; अन्यथा खळखट्याक आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे.

मनसेचे शहराध्यक्ष, गटनेते सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेतली. तसेच ‘पे अँड पार्क’ रद्द करण्याची मागणी केली. रुपेश पटेकर, अश्विनी बांगर, हेमंत डांगे, सुशांत साळवी, सिमा बेलापुरकर, विशाल मानकरी, अनिकेत प्रभु, रोहिदास शिवणेकर, सुरेश सकट, अनिता पांचाळ आदी उपस्थित होते.

सचिन चिखले म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात 1 जुलैपासून ‘पे अँड पार्क’ योजना कार्यान्वित केली आहे. या पार्किंग धोरणाची अंमलबजावणी शहरात सुरु आहे. यात 13 मुख्य रस्ते व उड्डाणपुलाखालील काही जागांचा समावेश आहे. मुळात अशा जाचक योजनेसाठी नागरिकांच्या सुचना/हरकती यांचा विचार झालेला नाही. योजनेचा कोणताही आराखडा नागरिकांपुढे ठेवलेला नाही.

‘पे अँड पार्क’मुळे रस्त्यावर लावलेल्या वाहनांकडून पावतीच्या माध्यमातून दंड आकारला जातोय. नागरिक संभ्रमात आहेत. आर्थिक भुर्दंडालाही सामोरं जावं लागत आहे. वाहने रस्त्यावर लावल्यामुळे पावती फाडणारे व्यवस्थापन व नागरिकांमध्ये बाचाबाची होत आहे.

त्यामुळे शहर मनसेचा ‘पे अँड पार्क’ योजनेला विरोध आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेतदेखील आम्ही ही योजना गुंडाळण्याची मागणी केली होती. आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करून सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर शहरात ‘पे अँड पार्क’ योजनेची अंमलबजावणी सुरु केली. मुळात या योजनेत अनेक त्रुटी आहेत.

मुख्य रस्त्याच्या कडेला असणाऱ्या बँका, खासगी व शासकीय कार्यालयं, वर्दळीची ठिकाणं अशा ठिकाणी केवळ पाच मिनिटांच्या कामासाठी नागरिकांना पाच ते वीस रुपयांच्या पावत्या फाडाव्या लागत आहेत. ही योजना मुळीच नागरिकांच्या हिताची नाही. त्यामुळे शहरातून ‘पे अँड पार्क’ योजना रद्द करावी; अन्यथा आम्हाला खळळखट्याक आंदोलन करावे लागेल, असा इशारा चिखले यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.